

Share Market Closing Bell : नोव्हेंबरमध्ये महागाई दरात झालेली घट आणि अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह व्याजदरवाढीची गती कमी करेल या शक्यतेने अमेरिकेतील प्रमुख निर्देशांक वधारुन बंद झाले. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी कायम राहिली. आज बुधवारी (दि.१४) सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे २०० अंकांनी वाढून ६२,७०० वर गेला होता. तर निफ्टी १८,६०० वर होता. त्यानंतर बाजार बंद होताना ही तेजी काही प्रमाणात कमी झाली. सेन्सेक्स १४४ अंकांनी वाढून ६२,६७७ वर बंद झाला. तर निफ्टी ५२ अंकांच्या वाढीसह १८,६६० वर बंद झाला.
NSE बँक निफ्टी निर्देशांकाने आज सलग दुसऱ्या सत्रात विक्रमी उच्चांक गाठला. सकाळच्या व्यवहारात बँक निफ्टीने ४४ हजार अंकांची पातळी गाठली आणि त्यानंतर उत्तरार्धात ही पातळी ४४,१०० वर कायम राहिली. निफ्टी ५० वर्षभरात जवळपास २४ टक्क्यांनी वाढला आहे. आर्थिक उलाढालींमध्ये वाढ आणि महागाईचा दर कमी झाल्याने बँकिंग शेअर्संनी बाजारात आघाडी घेतली आहे. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एसबीआय हे निफ्टीवर सर्वात सक्रिय स्टॉक होते.
NSE निफ्टी निर्देशांकावर ओएनजीसी, हिंदाल्को, एनटीपीसी, आयशर मोटर्स हे शेअर्स आघाडीवर (top gainers) राहिले. ONGC चा शेअर्स २.६३ टक्यांनी वधारला. नेस्ले इंडिया, भारती एअरटेल, एशियन पेंट्स, आयसीआयसीआय बँक आणि हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्स पिछाडीवर राहिले. नेस्ले इंडिया १.५ टक्क्यांनी खाली घसरला. तर बीएसई सेन्सेक्सवर १५६ शेअर्संनी वाढून ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला. (Share Market Closing Bell)
देशातील किरकोळ महागाई दरापाठोपाठ घाउक महागाई निर्देशांकातही घसरण झाली असून सरत्या नोव्हेंबर महिन्यात घाउक महागाई निर्देशांक ५.८५ टक्के इतका नोंदविला गेला आहे. विशेष म्हणजे घाऊक महागाई निर्देशांकाचा हा गेल्या २१ महिन्यांतला निचांकी स्तर आहे. मागील सप्टेंबर महिन्यात हा निर्देशांक १०.५५ टक्के इतका होता. तर ऑक्टोबर महिन्यात तो ८.३९ टक्के इतका होता. सलग दुसऱ्या महिन्यात घाऊक महागाई निर्देशांक दहा टक्क्यांच्या खाली नोंदवला गेला आहे.
अमेरिकेची प्रमुख बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात ५० बेसिस पॉइंट्स इतक्या कमी वाढीच्या शक्यतेने गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आहेत. यामुळे आज आशियाई बाजारात तेजी राहिली. जपानचा निक्केई निर्देशांक ०.८४ टक्क्यांनी, दक्षिण कोरियाचा कोस्पी ०.८२ टक्क्यांनी, चीनचा शांघाय कंपोझिट ०.१३ टक्क्यांनी आणि हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक ०.६९ टक्क्यांनी वधारल्याचे दिसून आले.
डेटा असा दर्शवितो की जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेतील महागाई दर ऑक्टोबरमधील ०.४ टक्क्यांच्या वाढीनंतर नोव्हेंबरमध्ये ०.१ टक्के इतका किरकोळ प्रमाणात वाढला. वर्षभरात महागाई दर निर्देशांक ७.१ टक्क्यांनी वाढला आहे. दरम्यान, फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर वाढीच्या निर्णयाआधी बुधवारी युरोपीय शेअर्स घसरले. याआधी युरोपीय शेअर्स एका आठवड्याच्या उच्चांकावर गेले होते. त्यात आता घसरण झाली आहे.
हे ही वाचा :