नाऊर : महायज्ञ कार्यक्रमाच्या नियोजनासाठी बैठक | पुढारी

नाऊर : महायज्ञ कार्यक्रमाच्या नियोजनासाठी बैठक

नाऊर : पुढारी वृत्तसेवा :  श्रीरामपूर तालुक्यातील श्रीक्षेत्र सराला बेट येथे होणार्‍या सदगुरू गंगागिरी महाराज व सदगुरू नारायणगिरी महाराज यांच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा व महायज्ञ कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आ. लहू कानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. महंत रामगिरी महाराज यांनी सुचवल्यानुसार सदगुरु श्री गंगागिरी महाराज संस्थान, श्रीक्षेत्र सराला बेट संस्थान येथे योगीराज सदगुरु श्री गंगागिरी महाराज मंदिर येथे दि. 16 ते 25 डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या नियोजनासाठी विविध विभागाच्या अधिकार्‍यांना सराला बेट येथे निमंत्रीत करण्यात आले होते.

बैठकीसाठी प्रांताधिकारी अनिल पवार, तहसिलदार प्रशांत पाटील, तालुका पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, सा. बां. विभागाचे उपअभियंता नितीन गुजरे, गटविकास अधिकारी अनंत परदेशी, वैद्यकिय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय योगेश बंड, उंदिरगाव प्रा. आरोग्य केंद्राचे डॉ. एस. व्ही. राजगुरू, तालुकाध्यक्ष अरुण नाईक, तालुका उपाध्यक्ष सतीश बोर्डे, राजेंद्र औताडे आदी मान्यवर उपस्थित होते. आ. कानडे यांनी सर्व अधिकारी वर्गाला कार्यक्रमादरम्यान सतर्क राहण्याचे आदेश दिले.

कार्यक्रमास कुठलीही बाधा येणार नाही, याची दक्षता व खबरदारी घेण्यासह होणारी गर्दी, बेटाकडे प्रवेश करताना मुख्य प्रवेशद्वार रस्त्यावर होणारी दुकानांची गर्दी यावर विरगाव पोलिस स्टेशन तसेच श्रीरामपूर तालुका पोलिस स्टेशनने योग्य ती जबाबदारी पार पडण्याची सूचना केली. याप्रसंगी प्रांताधिकारी अनिल पवार म्हणाले आर.टी.ओ. व वाहतूक पोलिस विभागास पत्राद्वारे सूचना देऊन वाहतूक व्यवस्था नियंत्रणासाठी दोन्हीचा समन्वय साधण्याबाबत सुचित करण्यात येईल, असे सांगितले.

Back to top button