Samruddhi Mahamarg : देशाच्‍या विकासासाठी ‘शॉर्टकट’ नव्हे, ‘व्हिजन’ महत्त्‍वाचे : पंतप्रधान मोदी | पुढारी

Samruddhi Mahamarg : देशाच्‍या विकासासाठी 'शॉर्टकट' नव्हे, 'व्हिजन' महत्त्‍वाचे : पंतप्रधान मोदी

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : केवळ सत्तेसाठी आमदनी अठ्ठणी आणि खर्चा रुपया, या पद्धतीने करदात्यांच्या पैशाचा गैरवापर होऊ नये. कुठलेही व्हिजन नाही, देशाच्या विकासात कुठलाही शॉर्टकट चालत नाही, राष्ट्रहित समोर ठेऊन काम करणे गरजेचे आहे. दिशाहीन, स्वार्थी राजनीती महत्त्वाची की स्थायी विकास ? असा सवाल करून स्थायी समाधान निवडायचे, हे देशातील जनतेने आता ठरविले आहे. (Samruddhi Mahamarg) नुकत्याच झालेल्या गुजरातच्या निवडणुकीत जनतेने याविषयीचा निर्णय दिलेला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.११) सकाळी नागपुरात साडेतीन तासांच्या दौऱ्यात वायफळ टोलनाका येथे नागपूर -शिर्डी समृद्धी महामार्ग, (Samruddhi Mahamarg) एम्स, मेट्रो फेस 1 लोकार्पण, फेज 2 शुभारंभ, नागपूर – बिलासपूर वंदेभारत एक्सप्रेसला हिरवी झेंडी, अजनी, नागपूर रेल्वेस्थानक विकास, अजनी मेंटेनन्स डेपो, चंद्रपूरचा 51 कोटींचा सिपेट प्रकल्प अशा विविध योजनांचा शुभारंभ केला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर राज्यपाल भगतसिंग कोशारी ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, भारती पवार, खासदार कृपाल तुमाने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

देशाचा पैसा लुटणाऱ्यांपासून सावध राहिले पाहिजे

आम्ही पुढचे 25 वर्षाचे व्हिजन घेऊन काम करीत आहे. महाराष्ट्रातील जनतेने देशातील या विकृतीपासून, शॉर्टकट राजकारणापासून, देशाचा पैसा लुटणाऱ्यांपासून, त्यांची कमाई लुटणाऱ्या या राज्यकर्त्यांकडून, राजकीय पक्षांकडून सावध राहिले पाहिजे, आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. कारण हे लोक सत्ता हडपण्यासाठी कार्यरत आहेत. ते कधीही देश घडवू शकत नाहीत, असा घणाघात त्यांनी कुणाचेही नाव न घेता विरोधकांवर केला.

करदात्याने दिलेल्या पैसा आजवर केवळ भ्रष्टाचारात किंवा सत्तेसाठीच वापरला गेला. आज देशाची ही गंगाजळी युवा पिढीच्या भविष्यासाठी आम्ही खर्च करीत आहोत. जे वंचित उपेक्षित राहिले, आजवर ते आता आमच्या प्राधान्य क्रमवारीत पुढे आहेत. छोट्या शेतकऱ्यांसाठी आम्ही काम करतोय. पशुपालकांसाठी काम करतो आहे. वेंडर्सना सुविधा देऊन त्यांना कर्ज देत आहे.

विदर्भातील गोसीखुर्द प्रकल्प रखडला

गोसीखुर्द प्रकल्प गेली 30-35 वर्षे रखडला. सुरुवातीला 400 कोटींचा खर्च असलेला हा प्रकल्प संवेदनहीन कार्यशैलीतून आज 18000 कोटींवर गेला. 2017 पासून राज्यात डबल इंजिनचे सरकार आल्यानंतर हा प्रकल्प आज पूर्णत्वाकडे आहे. यंदा जलसाठा पूर्ण क्षमतेने झालेला आहे. देशात पहिल्यांदा सरकारने इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीत मानवी हीत जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. काशी, उज्जैन, पंढरपूर विकासात संस्कृती जपणुकीसोबतच पायाभूत विकासावर भर दिला आहे, असेही त्‍यांनी नमूद केले.

Samruddhi Mahamarg : 11 प्रकल्प, योजनांचा पुष्पगुच्छ, महाराष्ट्रात दरवळणार सुगंध

नागपूर, विदर्भासाठी एकंदर 11 विकास प्रकल्प, विविध योजनांचे लोकार्पण ही एक ११ नक्षत्रे आहेत. यासाठी गेल्या आठ वर्षांची मेहनत कारणीभूत आहे. महाराष्ट्रात डबल इंजिनचे सरकार गतिमानतेने काम करीत आहे. समृद्धी महामार्गामुळे 24 जिल्ह्यांची कनेक्टिव्हिटी होणार आहे. भाविकांसोबत उद्योजकांना, पर्यटनवाढीला चालना मिळत रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्राला 75 हजार कोटींची ही मोठी भेट दिली असल्याचे सांगून त्यांनी जनतेचे अभिनंदन केले.

मोदी यांनी केले टेकडी गणेशाला वंदन

आपल्या भाषणाच्या सुरुवातीला मोदी यांनी मराठीतून नागपूरचे आराध्य दैवत टेकडी गणेशाला वंदन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धडाडीचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून कौतुक केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव असलेल्या महामार्गाचे केवळ आपणच उद्घाटन करावे, असे आमच्या मनात होते. आज ही स्वप्नपूर्ती होत असल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले.

हेही वाचा : 

Back to top button