सलग दुसऱ्या महिन्यात रशिया बनला भारताचा सर्वात मोठा तेल निर्यातदार देश | पुढारी

सलग दुसऱ्या महिन्यात रशिया बनला भारताचा सर्वात मोठा तेल निर्यातदार देश

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : रशियाकडून भारताला होत असलेल्या कच्च्या तेलाच्या निर्यातीत वाढ होत आहे. सलग दुसऱ्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये हा देश भारताला सर्वाधिक तेलाची निर्यात करणारा देश बनला आहे. नोव्हेंबर महिन्यात भारताने रशियाकडून 9 लाख 9 हजार 403 बॅरल इतकी क्रूड तेलाची आयात केली होती. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या इराक आणि सौदी अरेबियाकडून क्रमश 8 लाख 61 हजार 461 बॅरल व 5 लाख 70 हजार 922 बॅरल इतक्या क्रूड तेलाची आयात करण्यात आली होती.

आतापर्यंत एक पंचमांश इतके तेल रशियाकडून खरेदी

इराक आणि सौदी अरेबिया हे भारताचे परंपरागत तेल निर्यातदार देश आहेत. तथापि रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यान सुरु झालेल्या युद्धापासून रशियाची भारताला होत असलेली क्रूड निर्यात झपाट्याने वाढवली आहे. अमेरिका आणि युरोपियन देशांनी रशियन क्रूडवर बंदी घातल्याने रशिया कमी दरात भारत, चीन आदी देशांना क्रूड निर्यात करत आहे. गत आर्थिक वर्षात भारताने आपल्या एकूण गरजेपैकी केवळ 0.2 टक्के इतके क्रूड तेल रशियाहून खरेदी केले होते. त्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत एक पंचमांश इतके तेल खरेदी केले आहे. ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या वोरटेक्सा नावाच्या संस्थेने ही माहिती दिली आहे.

ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये भारताला रशियन तेलाची आवक कमी झाली. गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यात भारताने रशियाहून केवळ 36 हजार 255 बॅरल इतकी क्रूड तेलाची आयात केली होती. त्या महिन्यात इराकहून 1.05 दशलक्ष बॅरल तर सौदीहून 9 लाख 52 हजार 625 बॅरल इतकी तेलाची आयात करण्यात आली होती.

हेही वाचा :

Back to top button