ढोरजळगाव : गुटखा बाहेर थुंकून ये, असे सांगितल्याच्या रागातून वैद्यकीय अधिकार्‍यास मारहाण | पुढारी

ढोरजळगाव : गुटखा बाहेर थुंकून ये, असे सांगितल्याच्या रागातून वैद्यकीय अधिकार्‍यास मारहाण

ढोरजळगाव : पुढारी वृत्तसेवा :  तोंडातील गुटखा बाहेर थुंकून ये, असे सांगितल्याच्या रागातून वैदयकीय अधिकार्‍यांना मारहाण करण्यात आली. मंगळवारी दुपारच्या सुमारास ढोरजळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात हा प्रकार घडला. सुशीलकुमार सुरेश बडे असे मारहाण झालेल्या वैद्यकीय अधिकार्‍याचे नाव आहेे. त्यांच्या फिर्यादीवरून अमरापूर येथील बलभीम मुरलीधर पठाडे नावाच्या तरुणाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वैद्कीय अधिकारी बडे हे सहकार्‍यांसमवेत ढोरजळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची तपासणी करत होते. पठाडे याने गुटखा खाऊन तपासणी कक्षात प्रवेश केला. त्यांचे बोलणे व्यवस्थित ऐकू येत नसल्याने तोंडातील गुटखा बाहेर थुंकून ये, बोलतांना अंगावर थुंकी उडत असल्याचे डॉ. बडे यांनी त्याला म्हणाले. त्याच रागातून पठाडे याने डॉ. बडे यांना शिवीगाळ करत मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पठाडे याने खुर्च्या फेकून देत टेबलावरील कागदपत्रे अस्ताव्यस्त केली. गोंधळाचा आवाज ऐकून अन्य कर्मचारी तिकडे धावले. त्यानंतर कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन करत पठाडे यास पोलिसांच्या ताब्यात दिले. पठाडे या तरुणाविरोधात सरकारी कामात अडथळा व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र बागूल हे अधिक तपास करीत आहेत.

आरोग्य विभागाकडून निषेध

दरम्यान पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी तसेच आरोग्य विभागातील परीचारीका व कर्मचार्‍यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत या घटनेचा निषेध केला. संबंधीतावर कडक स्वरुपात कारवाई करण्याची मागणी आरोग्य विभागाने पोलिसांकडे केली.

Back to top button