पिंपरी शहरात सहा ठिकाणी चोरीच्या घटना; सव्वाचार लाखांचा ऐवज चोरीला | पुढारी

पिंपरी शहरात सहा ठिकाणी चोरीच्या घटना; सव्वाचार लाखांचा ऐवज चोरीला

पिंपरी : शहरात परिसरात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. रविवारी (दि. 4) शिरगाव, हिंजवडी, दिघी, महाळुंगे, पिंपरी पोलिस ठाण्यात चोरीचे सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये चार लाख 24 हजारांचा ऐवज चोरीला गेल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे.
पहिल्या प्रकरणात महेबूब अजमोदिन शेख (26, रा. चिंचोली, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शनिवारी (दि. 3) रात्री पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाका येथे कारमध्ये झोपले होते. त्या वेळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या खिशातून पाच हजार रुपये आणि चार हजारांचा मोबाईल चोरून नेला. शिरगाव पोलिस तपास करीत आहेत. दुसर्‍या प्रकरणात आदिनाथ ज्ञानेश्वर मेंचकर (21, रा. बावधन, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी बावधन येथील ऑक्सफर्ड हेलिपॅडजवळ मंडप सजावटीचे काम करीत होते. त्या वेळी चोरट्यांनी दोन कामगारांचे 12 हजारांचे दोन मोबाईल फोन आणि त्याच्या कव्हरमध्ये ठेवलेली 26 हजारांची रोकड असा 38 हजारांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला.
तिसर्‍या प्रकरणात व्यंकटराव नागनाथराव मेळगावे (32, रा. बुचडेवस्ती, मारुंजी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांनी शनिवारी (दि. 3) रात्री लक्ष्मी चौकातील लक्ष्मी फर्निचरच्या दुकानासमोर त्यांची 30 हजारांची दुचाकी पार्क केली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार रविवारी सकाळी साडेअकरा वाजता उघडकीस आला. चौथ्या प्रकरणात विष्णू गणपत कराड (46, रा. इंद्रायणीनगर, देहूफाटा. मूळ रा. लातूर) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी यांनी त्यांची 25 हजार रुपये किमतीची दुचाकी पार्क केली होती. दरम्यान, शनिवारी (दि. 3) सायंकाळी सहाच्या सुमारास अज्ञातांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. दिघी पोलिस तपास करीत आहेत. पाचव्या प्रकरणात महेंद्र ज्ञानदेव घोरपडे यांनी महाळुंगे चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी विश्वनाथ भगवान कचरे (वय 26, रा. बुलढाणा), दीपक नाना सपकाळ (वय 36, रा. जळगाव) या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी निघोजे येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतून एक लाख 47 हजार 28 रुपये किमतीच्या 49 बॅटर्‍या चोरून नेल्या होत्या. प्रकरणात रमेश लक्ष्मणदास जेठवानी (58, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे.

Back to top button