नागपूर : ज्वलनशील पदार्थ अंगावर फेकल्याने चिमुरड्यासह महिला जखमी | पुढारी

नागपूर : ज्वलनशील पदार्थ अंगावर फेकल्याने चिमुरड्यासह महिला जखमी

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : महिलेसह तिच्या अडीच वर्षांच्या मुलावर पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी ज्वलनशील पदार्थ फेकल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. नागपुरातील यशोधरानगरच्या विनोबा भावेनगरात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात चिमुकला आणि महिला जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लता पुराणिक वर्मा (वय 24, रा. विनोबा भावेनगर) असे जखमी महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, लता गृहिणी असून तिचे पती ड्रायव्हर आहेत. रविवारी सकाळी पुराणिक काही कामानिमित्त बाहेर गेले होते. तर सकाळी 10 च्या सुमारास लताही बाळाला सोबत घेऊन काही कामानिमित्त घरातून निघाली होती. घरापासून काही अंतरावर गेल्यावर पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघा अनोळखींनी लतावर ज्वलनशील पदार्थ फेकले आणि भरधाव निघून गेले. सुदैवाने त्यांचा नेम चुकल्यामुळे लता आणि तिच्या बाळावर जास्त ज्वलनशील पदार्थ पडला नाही. दोघांच्या हात व पोटाला दुखापत झाली.

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी तत्काळ लताला आणि तिच्या बाळाला मेयो रुग्णालयात भरती केले. लता व तिच्या बाळाला गंभीर दुखापत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

लतावर फेकण्यात आलेले ज्वलनशील पदार्थ नेमके काय होते, आणि तो कुणी फेकला, याचा आता पोलिसांनी शोध सुरू केला आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेज तपासत आहेत. लताच्या पतीचा कोणाशी तरी वाद सुरू आहे. त्या वैमनस्यातून हा हल्ला झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button