डोंबिवली : गोठ्यात हल्ला करून चोरी करणारे दोघे जेरबंद | पुढारी

डोंबिवली : गोठ्यात हल्ला करून चोरी करणारे दोघे जेरबंद

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : कोळसेवाडी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या म्हशींच्या गोठयात आज (दि.५) पहाटे दोन चोरट्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.  रोशन शर्मा आणि कृष्णा उर्फ बबल्या अशी कोळसेवाडी पोलिसांनी  अटक केलेल्‍या चोरट्यांची नावे आहेत. ते कल्याण पूर्व येथील आनंदवाडी परिसरात राहतात. दरम्यान, या परिसरात सातत्याने नशेखोर चोरटे फिरत असूनही पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जयहिंद राम केवल यादव यांचा काटेमानवली परिसरातील  गोठा  आहे. त्यांच्यासमवेत आणखी काही सहकारी देखील आहेत. दररोज सकाळी गोठा साफ करणे, दूध काढणे अशी नित्याची कामे ते रविवारी पहाटे करत होते. ते कामात व्यग्र असताना गोठ्याचे दार उघडून दोघे चोरटे गोठ्यात शिरले. जयहिंद यांना आवाज आल्याने ते पुढे आले असता दोघे जण लॅपटॉपची चोरी करताना दिसले. त्या दोघांपैकी कृष्णा उर्फ बाबल्या याला पकडण्‍याचा प्रयत्न करताच त्याने जवळील चाकू काढत जयहिंदच्या हातावर आणि मानेवर चाकूने वार केले. तो पळून जाण्यात यशस्वी झाला. तर त्याचा दुसरा साथीदार रोशन याला जयहिंद याच्या सहकाऱ्यांनी पकडून ठेवले. त्यांनी आरडा-ओरड केल्याने परिसरातील नागरिक गोठ्यात धावत आले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पकडलेल्या चोरट्याला ताब्यात घेतले. दरम्यान,पसार झालेल्‍या कृष्णा उर्फ बाबल्या याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button