बारामती : पंचवार्षिक निवडणूक ग्रामपंचायतींच्या पथ्यावर; कराची लाखोंची थकबाकी वसूल | पुढारी

बारामती : पंचवार्षिक निवडणूक ग्रामपंचायतींच्या पथ्यावर; कराची लाखोंची थकबाकी वसूल

बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सध्या सुरू आहे. यामुळे करांची थकबाकी वसूल झाल्याने निवडणूक ग्रामपंचायतीच्या पथ्यावर पडल्याचे चित्र बारामती तालुक्यात पाहायला मिळत आहे. निवडणूक लढविण्यासाठी लागणार्‍या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ना-हरकत दाखले लागतात. यासाठी ग्रामपंचायतीकडे असलेली थकबाकी भरावी लागते.

त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून ग्रामपंचायतीला एकही रुपया न भरलेल्या ग्रामस्थांनी थकीत असलेली घरपट्टी व पाणीपट्टी भरल्याने ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढले आहे. एकीकडे ग्रामपंचायतीच्या कामगारांचे पगार करायला देखील पैसे नसणार्‍या ग्रामपंचायतींची लाखात वसुली झाली आहे. तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक धूमधडाक्यात सुरू आहे. 2 डिसेंबरला अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून, सोमवारी (दि. 5) अर्ज छाननी व बुधवारी (दि. 7) अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे.

गावातील इतर विकास करण्यासाठी शासन ग्रामपंचायतींना भरभरून निधी देत असते. यातून गावातील रस्ते, पाण्याच्या योजना, वीज, गटारे यांची कामे केली जातात. मात्र, पाणीपुरवठा योजनांचे वीजबिल, कामगारांचे पगार व इतर खर्च हे घरपट्टी व पाणीपट्टी यामधून करावे लागतात. मात्र, अनेक गावांतील ग्रामस्थ वेळेवर घरपट्टी व पाणीपट्टी भरत नसल्याने ग्रामपंचायतींना उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे कामगार पगार, वीजबिल व इतर खर्च करण्यास ग्रामपंचायतींवर निर्बंध येतात. पाणीपुरवठा योजनांचे वीजबिल न भरल्यामुळे अनेक ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांची वीज तोडली जाते.

तीनच दिवसांत पश्चिम भागातील मुरुम ग्रामपंचायतीकडे 4 लाख, वाणेवाडी 4 लाख 50 हजार, वाघळवाडी 4 लाख, गडदरवाडी 50 हजार, तर सोरटेवाडी ग्रामपंचायतीने 65 हजार रुपयांची थकबाकी जमा केली आहे. एरवी एकही रुपया न भरणार्‍या ग्रामस्थांनी निवडणुकीसाठी का होईना ग्रामपंचायतीकडे पैसे भरत थकबाकी शून्य केली आहे.

ग्रामस्थांना उन्हाळा सुसह्य जाणार..!
ग्रामस्थांकडे असलेली थकबाकी वेळेत वसूल होत नसल्याने आणि वीजबिले थकीत असल्याचे कारण सांगत महावितरण पाणीपुरवठा योजनांची वीज खंडित करते. पाणी बंद झाल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल होतात. जमा झालेल्या निधीतून वीजबिले भरल्यास ग्रामस्थांना उन्हाळा सुसह्य जाणार आहे.

Back to top button