सातारा : अनैतिक संबंध सुरु असतानाच आज्जी आली म्हणून केला खून! | पुढारी

सातारा : अनैतिक संबंध सुरु असतानाच आज्जी आली म्हणून केला खून!

वडूज : पद्मनील कणसे : अनैतिक संबंध : भिक्षा मागणे, पडेल ते काम करणे, सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवून सर्वांना आपलेसे करुन आयुष्याचा उत्तरार्ध व्यतीत करणार्‍या येलमरवाडी येथील 70 वर्षीय हिराबाई जगताप या आजीचा केवळ अनैतिक संबंध मध्ये अडथळा ठरल्याने खून झाला.

या घटनेने अवघा खटाव तालुका हादरुन गेला आहे. तर घटनास्थळावर पोलिसांच्या हालचालींवर वॉच ठेवून असलेल्या संशयिताला पोलिसांच्या भेदक नजरेने हेरले आणि त्याला अलगद ‘कॅच’ केले.

येलमरवाडी, येथे हिराबाई दगडू जगताप या रविवारी साडेनऊच्या सुमारास डोक्यात वर्मी घाव झाल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसून आल्या. याची माहिती गावातील नागरिकांनी त्यांच्या नातेवाईकांना दिली.

असा आरोपी सापडला

ही घटना पोलीसांना समजताच घटनेचे गांभीर्य ओळखून सपोनि मालोजीराव देशमुख व पथकाने तातडीने घटनास्थळ गाठले. त्याठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडलेल्या हिराबाई जगताप यांना वडूज येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर सपोनि देशमुख व त्यांच्या पथकाने प्राथमिक चौकशी सुरू केली.

चौकशी दरम्यान हिराबाई जगताप या सामान्य कुटुंबातील असून त्यांचे कोणाशी काही वैर नसल्याचे समोर आले. ग्रामस्थांकडे सपोनि देशमुख हे विविध अँगल मधून चौकशी करत असताना अंधारातून कोणीतरी पोलिसांच्या चाललेल्या चौकशीवर वॉच ठेवून असल्याचे त्यांच्या नजरेस पडले.

दरम्यान, त्यांनी त्याठिकाणी हजर असणार्‍या पोलिस हवालदार दीपक देवकर यांना नजरेने खुणावत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्यास सांगितले. देवकर यांनी नजरेचा आदेश समजून अंधाराच्या आडोशाला दबा धरुन बसलेल्या व्यक्तीला शिताफीने ताब्यात घेतले.

त्यानंतर पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवताच तुळशीराम सखाराम बागल याने तोंड उघडले व त्यांचे अनैतिक संबंध असल्याचे बिंग फुटले. त्यानंतर लगेचच त्याचाकडून माहिती घेत पोलिसांनी त्याची प्रेयसी संगीता गणपत देशमुख हिचे घर गाठले. त्याठिकाणी तिच्या घरात रक्ताचे डाग दिसून आल्याने पोलिसांची खात्री पटली व दोन्ही संशयितांना गजाआड केले.

या खुनाच्या उकलीमध्ये पोलिस उपनिरीक्षक शितल पालेकर, पोलिस हवालदार शांतीलाल ओंबासे, दादासाहेब देवकुळे, चंद्रकांत वाघ, अश्विनी काळभोर, नितीन सजगणे, रमेश बर्गे, चंदनशिवे, दीपक देवकर, संदीप शेडगे, सागर बदडे, दर्‍याबा नरळे, भूषण माने यासह कर्मचार्‍यांनी महत्त्वाची भूमिका बजवली.

पोट भरायला गेली आणि जीवाला मुकली…

वय झाल्याने उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नसल्याने दारोदारी भिक्षा मागणे हे काम हिराबाई जगताप करत. भिक्षा मागायला गेल्यावर कोणी हिराबाई यांना भाजी नीट करायला लावत, तर कोणी भांडी घासायला. याशिवाय त्या इतरांना मदत म्हणून पडेल ते घरगुती काम फक्त जेवणासाठी करत होत्या. या व्यतिरिक्त त्यांची कोणतीही अपेक्षा नसे. मात्र रविवारी रात्री पोटाची खळगी भरायला मागितलेली भिक्षा ही त्यांच्या जीवावर उठली आणि काळरात्र झाली. त्यामुळे काळीज सुन्न होणारी घटना ऐकून गावातील ग्रामस्थ देखील निशब्द झाले.

संशयितांना चार दिवसांची कोठडी

येलमरवाडी, ता. खटाव येथील निराधार वृद्ध महिलेचा डोक्यात घाव घालून खून केल्याप्रकरणी संशयितांना वडूज पोलिसांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले. न्यायालयाने संशयितांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

येलमरवाडी येथे रविवार दि. 12 सप्टेंबर रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान हिराबाई जगताप यांच्या डोक्यात गंभीर दुखापत करत त्यांचा खून करण्यात आला. त्याप्रकरणी वडूज पोलिसांनी संशयित तुळशीराम बागल व संगीता देशमुख यास अटक केली होती. वडूज पोलिस ठाण्यात अटकेत असलेल्या संशयितांना वडूज पोलिसांनी मंगणवारी वडूज न्यायालया समोर हजर केले. दरम्यान, न्यायालयाने  संशयितांना चार दिवसांची पोललिस कोठडी सुनावली.

हे ही वाचलं का?

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

Back to top button