नेहरूनगर हॉकी स्टेडियमवर उधळपट्टी सुरूच | पुढारी

नेहरूनगर हॉकी स्टेडियमवर उधळपट्टी सुरूच

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नेहरूनगर, पिंपरी येथील मेजर ध्यानचंद पॉलिग्रास स्टेडिमयसाठी सातत्याने विविध कामे काढून वारेमाप खर्च करण्याचा सपाटा सुरू आहे. आता, स्टेडिमयला उच्चदाब वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणाचे तब्बल 24 लाख रुपये शुल्क भरले जाणार आहे. पॉलिग्रास स्टेडियम व मैदानावर सातत्याने मोठा खर्च केला जात आहे. तेथील दिवे बदलण्यासाठी तब्बल 5 कोटी 50 लाख खर्च करण्यात आला आहे. त्यासाठी जागतिक हॉकी महासंघाच्या नियमाचे कारण पुढे करण्यात आले आहे. त्यानंतर स्टेडिमयचा अत्याधुनिक पद्धतीने विकसित करण्यासाठी 3 कोटी 95 लाखांचा खर्चास मंजुरी देण्यात आली.

आता स्टेडियमला उच्च दाब वीजपुरवठा करण्यासाठी 23 लाख 78 हजार 67 रूपये महावितरणकडे सुरक्षा ठेव म्हणून खर्च केले जाणार आहे. त्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली आहे. हा वीजपुरवठा सहा देशांच्या कनिष्ठ गट पुरुष हॉकी स्पर्धेसाठी तात्पुरत्या स्वरूपात घेण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी अंदाजे 500 केव्हीए विजेची आवश्यक आहे. वीज पर्यवेक्षण व सुरक्षा ठेव म्हणून ती रक्कम भरण्यास महावितरणने कळविले होते. त्यानुसार, हे शुल्क ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या विद्युत विभागाकडून भरले जात आहे. एकाच खेळाच्या हॉकी स्टेडिमयवर सातत्याने मोठ्या प्रमाणात उधळपट्टी केली जात असल्याने क्रीडाक्षेत्रातून शंका उपस्थित केली जात आहे.

Back to top button