शेवगाव : बारा ग्रामपंचायतींवर प्रशासकराज ! | पुढारी

शेवगाव : बारा ग्रामपंचायतींवर प्रशासकराज !

शेवगाव : रमेश चौधरी : 

शेवगाव तालुक्यातील निवडणूक प्रक्रियेत असलेल्या सर्व 12 ग्रामपंचायतीवर आता प्रशासक राज सुरू झाले आहे. तेथील सरपंच, उपसरपंचासह सर्व सदस्यांचा अधिकार संपुष्टात आल्याने, विद्यमान पदाधिकारी आता ‘तत्कालीन’ झाले आहेत. शेवगाव तालुक्यातील 10 नोव्हेंबर रोजी मुदत संपलेल्या 4 ग्रामपंचायतीवर यापूर्वीच प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर आता गुरुवारी (दि.24) नोव्हेंबरमध्ये मुदत संपलेल्या अमरापूर, दहिगावने, भायगाव, आखेगाव, वाघोली, खानापूर, जोहरापूर, रावतळे कुरुडगाव या 8 ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंचासह सदस्यांचा अधिकार संपुष्टात आल्याने शुक्रवार (दि.25) पासून सदर संस्थांचा जवळपास दोन महिने कारभार प्रशासकांच्या हाती आला आहे. या अगोदर मुदत संपलेल्या खामगाव, रांजणी, प्रभुवाडगाव, सुलतानपूर खु. या ग्रामपंचायतीवर चौदा दिवसांपूर्वी प्रशासकांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेतील सर्व ग्रामपंचायतींवर आता प्रशासक राज आले आहे.

दरम्यान, 12 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सोमवार (दि. 28) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असल्याने, त्या गावातील राजकारण तापले आहे. पूर्वी सदस्यपदाची निवडणूक लढविणार्‍या उमेदवारास 25 हजार रुपये खर्च करण्याची मर्यादा होती. आता त्यात सुधारणा करण्यात आली असून, ग्रामपंचायतीचे 7 ते 9 सदस्य असल्यास 25 हजार, 11 ते 13 सदस्य असल्यास 35 हजार, 15 ते 17 सदस्य असल्यास 50 हजार रुपये खर्चाची मर्यादा करण्यात आली आहे. तर, थेट सरपंच पदासाठी ग्रामपंचायतीचे 7 ते 9 सदस्य असल्यास 50 हजार, 11 ते 13 सदस्य असल्यास 1 लाख व 15 ते 17 सदस्य असल्यास 1 लाख 75 हजार रुपये खर्चाची मर्यादा असणार आहे .

यांची झाली प्रशासक म्हणून नियुक्ती

गुरुवारी मुदत संपलेल्या अमरापूर ग्रामपंचायतीवर सचिन भाकरे (विस्तार अधिकारी, सांख्यिकी पंचायत समिती), भायगाव – राहुल कदम (कृषी अधिकारी, पंचायत समिती), दहिगाव ने – आर. एस. जाधव (विस्तार अधिकारी, पंचायत समिती), आखेगाव – एस.एस. जगताप (विस्तार अधिकारी, पंचायत समिती), वाघोली – गौतम फौजगे (विस्तार अधिकारी, कृषी), खानापूर – सारंग दुगम (कृषी अधिकारी, पंचायत समिती), जोहरापूर- सुजित भोंग (विस्तार अधिकारी, पंचायत समिती), कुरूडगाव – डी. बी. शेळके (विस्तार अधिकारी, पंचायत समिती) यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली आहे.

Back to top button