पुणे : अवैध बांधकामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष | पुढारी

पुणे : अवैध बांधकामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गुलटेकडी मार्केट यार्डातील बाजार आवारात दुरुस्ती, तसेच तात्पुरत्या निवार्‍याच्या नावाखाली अडत्यांनी पक्के बांधकाम करण्याचा धडाका लावला आहे. कांदा-बटाटा विभागापाठोपाठ फळ व तरकारी बाजारातही प्रशासनाच्या परवानगीशिवाय शेड उभारण्यात आले आहे. या अवैध बांधकामाला बाजार समिती प्रशासनाचेच पाठबळ मिळत असून, अडत्यांच्या बेकायदेशीर कामाकडे प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.

पावसाळ्यात कांद्याची आणि भाजीपाल्याची आवक जास्त होत असल्याच्या नावाखाली यापूर्वी अडतदारांकडून बाजार आवारात तात्पुरता मंडप उभा केला जात असे. त्यानंतर महिनाभरानंतर हा मंडप काढला जाई. मात्र, आता तात्पुरत्या शेडच्या नावाखाली याठिकाणचे मंडप काढून तेथे पक्क्या स्वरूपाच्या गाळ्यांची बांधणी केली आहे. खासगी खर्चातून बांधकामे करून ठराविक व्यापार्‍यांनी संबंधित जागांवर ताबा मिळवला आहे. यात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा बाजारात सुरू आहे. बाजार समितीच्या आवारात पक्क्या बांधकामांसाठी महापालिकेची परवानगी आवश्यक आहे. त्याबरोबर पणन संचालकांची परवानगी घ्यावी लागते. मात्र, बाजारात अनेक गाळे कोणत्याही परवानगीशिवाय उभारले गेले आहेत. तसेच, तरकारी, फळ बाजारात प्रत्येक गाळ्यांच्या समोरही पत्र्याचे शेड उभे केले आहेत. याबाबतही बाजार समितीने कोणतीही परवानगी दिलेली नसताना शेड उभे राहिले आहेत. तरीही बाजार समिती प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Back to top button