रस्ता चुकलेली यात्रा | पुढारी

रस्ता चुकलेली यात्रा

विवेक गिरधारी  : या देशात महागाईवर एक शब्दही चर्चा होत नाही. ही यात्रा महागाईवर तारसप्तकात बोलत होती. या देशात हिंदू-मुस्लिम द्वेषाचे वातावरण निर्माण करणारे राजकारण एकीकडे करायचे आणि दुसरीकडे मुस्लिमांमधल्या मागास घटकांना लाभार्थी बनवून जवळ करायचे, असे राजकारण सुरू असताना ही यात्रा या धार्मिक द्वेषाविरुद्ध नारे देत चालत होती.

कन्याकुमारीहून काश्मीरकडे निघालेली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येताच ऐतिहासिक गफलतींवर ठेचाळेल असे कुणाला वाटले होते? आपला इतिहास एकदा घडून थांबत नाही. प्रत्येक वर्तमानात तो आकार, उकार बदलत चालत राहतो. इतिहासाच्या प्रत्येक वर्तमानाचे पर्व एकसारखे, एकच एक असत नाही. त्याकडे बघण्याची हरेक वर्तमानाची नजर वेगवेगळी होत आली आहे. जो सांगेल त्याचा इतिहास वेगळा, जो ऐकेल त्याचाही इतिहास वेगळा. खेड्यापाड्यांच्या, वाडीवस्त्यांच्या अंगावर रोमांच उभे करणारे कित्येक शाहीर डफावर थाप मारून गेले. त्यापैकी कुणाही शाहिराने कुठल्याच इतिहासाचा दाखला दिला नाही. एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडेही एक स्वतंत्र इतिहास सरकत असतो आपल्याकडे.

म्हणून कुणीच कुणाच्या इतिहासाचा नाद करू नये! तो कोणत्याही वर्तमानाला परवडणारा नाही. इतिहासातली मढी उकरायला गेलात तर वर्तमानात नवी थडगी उभी राहतात, हे तत्त्वज्ञान सांगणारी फार साधी माणसे असतात आपल्याकडे. शिवरायांचा पराक्रम सांगायचा तर अफजलखानाची कबर झाकून ठेवून चालणार नाही आणि औरंग्याची कबरदेखील दाखवावी लागेल; पण याच कबरींचे नसलेले वारस शोधण्याची गल्लत केली की गडबड अटळ म्हणायची, अशी सामान्यातली सामान्य जुनीजाणती माणसे जे सांगतात ते समजून उमजून घ्यावे लागेल. इतिहासात कोणत्याही राजाने दुसर्‍या राजाला पाठवलेल्या खलित्यांचे मायने शिव्यांनी सुरू होत नाहीत. समोरच्या राजाला आदर देऊनच हे खलिते सुरू झालेले दिसतात. त्यामुळे महात्मा गांधींनी ब्रिटिशांना लिहिलेल्या पत्राचा शेवट ‘आपला आज्ञाधारक नोकर’ अशा उल्लेखाने का होतो, हे आदब सोडलेल्या वर्तमानाला कधी कळेल का? हाच सवाल स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याही पत्रांना लागू होतो.

या इतिहासपुरुषांसमोर विनम्र होऊन उभे राहणेच आम्ही विसरून गेलो असल्याने वर्तमान असह्य करून टाकणार्‍या गफलती सातत्याने होत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा हीच गफलत करून बसेल असे मात्र वाटले नव्हते. सावरकरांच्या कथित माफीनाम्यावरून राहुल गांधी यांनी पुन्हा तेच आरोप केले, पुन्हा तेच प्रत्यारोप झाले, पुन्हा तेच वादविवाद झडले, पुन्हा तेच नेते एकमेकांना भिडले, पुन्हा त्याच त्याच समकालीन, उत्तुंग इतिहास पुरुषांचे, त्याच त्या सुमार मंडळींनी वाभाडे काढून घेतले. यातून भारत जोडो यात्रेला काय नवे मिळाले? की काँग्रेसनेही तीच जुनी घोडचूक नव्याने करून पायावर तोच धोंडा नव्याने पाडून घेतला ?

कन्याकुमारीपासून पायी चालत राहुल गांधी गेल्या 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात पोहोचले. सहा राज्ये आणि 28 जिल्ह्यांची माती पायाला लागूनही देशाच्या राजकारणाची दिशा त्यांना कळली नाही, असे म्हणणे दुर्दैवी ठरावे. सावरकरांची पत्रे आणि त्यातील अधोरेखित वाक्ये घेऊन राहुल गांधी यांनी यापूर्वीच वादंग निर्माण करून झाले आहे. हा वाद त्यांनी जाहीर सभांतून केला आणि लोकसभेतही अंगावर घेतला आहे. ‘सावरकरांवर केलेल्या विधानांबद्दल मी माफी मागणार नाही. कारण, माझे नाव राहुल सावरकर नाही. माझे नाव राहुल गांधी आहे,’ असेही त्यांनी जाहीर ठणकावून झाले आहे. त्यानंतर या देशात कोणतेही असे परिवर्तन घडले नाही. जे सावरकरवादी होते ते सावरकरवादीच राहिले. जे गांधीवादी होते ते गांधीवादीच राहिले. इतिहासातील पाने फडकावून ना राहुल यांचा जनसंग्रह वाढला, ना सावरकरवाद्यांचे वाडे ओस पडले. मग सावरकरांना मानणारा मोठा वर्ग असलेल्या, सावरकरांची जन्मभूमी- कर्मभूमी असलेल्या महाराष्ट्रात येऊन पुन्हा तोच वाद निर्माण करून राहुल गांधी यांनी काय कमावले? कमावले काहीच नाही.

राज्या-राज्यांत राजकीयदृष्ट्या एकाकी पडलेल्या काँग्रेसला महाराष्ट्रात केवळ भाजपकृपेने शिवसेनेसारखा नवा मित्र मिळाला. तोदेखील या वादात अस्थिर झाला. आपली आघाडी तुटू शकते, अशी गुरगुर शिवसेनेकडून ऐकू येताच राहुल गांधी यांनी पुढच्याच सभेत सावरकर विषयच बंद केला. आपण जणू त्या गावचेच नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. म्हणजे वाशीम, अकोला गाजवून शेगावला पोहोचेपर्यंत राहुल गांधीलिखित सावरकरी इतिहास भारत जोडोच्या दफ्तरी जमादेखील झाला. मग हा वाद निर्माण करून मिळवले काय? कन्याकुमारीहून निघालेली भारत जोडो यात्रा देशाचा राजकीय-सामाजिक नकाशा हरवून बसली आणि महाराष्ट्रातून जाता जाता रस्ताच चुकली कसा? या देशात महागाईवर एक शब्द चर्चा होत नाही. ही यात्रा महागाईवर तारसप्तकात बोलत होती. या देशात हिंदू-मुस्लिम द्वेषाचे वातावरण निर्माण करणारे राजकारण एकीकडे करायचे आणि दुसरीकडे मुस्लिमांमधल्या मागास घटकांना लाभार्थी बनवून जवळ करायचे, असे राजकारण सुरू असताना ही यात्रा या धार्मिक द्वेषाविरुद्ध नारे देत चालत होती.

बेकारीचा भस्मासुर कुणालाच दिसू नये, असे फर्मान असताना ही यात्रा प्रत्येक राज्यात काम शोधणार्‍या तरुणांचा हात धरून चालताना दिसली. नोटाबंदीच्या तडाख्यातून उभ्या राहू पाहणार्‍या अर्थव्यवस्थेशी बोलतानाही ही यात्रा दिसली. यातल्या कोणत्याही मुद्द्याशी सुतराम संबंध नसताना राहुल गांधी यांनी सावरकर वादाचा धागा या यात्रेच्या पायात बांधू पाहिला. तिथेच गडबड झाली. 2024 च्या निवडणुकांची राजकीय बेगमी करताना भाजपसारखा पक्ष फक्त बेरजेचे राजकारण करत असताना, सोबतचे सोडून जातील अशा चुका करणे राहुल गांधी यांना परवडणारे नाही.

ध्रुवीकरणाचे राजकारण करताना भाजप विरोधी घटक जोडून टाकण्याचे बेरजेचे राजकारण करत आपल्या बहुमतात भर घालताना दिसतो. त्याचवेळी काँग्रेसचे ध्रुवीकरणाच्या दिशेने पडणारे प्रत्येक पाऊल पंक्तीची गणती घटवणारे ठरते आहे. आर्थिक आरक्षणाच्या भूमिकेत ते दिसले आणि सावरकरांचा वाद उभा करण्यात देखील तोच अनुभव आला. ही भारत जोडो यात्रा तिरंगा घेऊन निघाली आहे. म्हणून ती या देशाची यात्रा ठरते. पंजाची नव्हे ! अजूनही प्रवास मोठा आहे. अशा सावरकरी गफलती टाळल्या तर ही यात्रा एक जागर या देशात घडवू शकेल. परिवर्तन फार मोठा शब्द झाला. जगण्याला जखडून टाकणार्‍या प्रश्नांकडे लोक निडरपणे बघू लागले तरी तो भारत जोडो यात्रेने घडवलेला बदल म्हणता येईल.

Back to top button