लोणी पोलिस ठाण्यालगत सर्रास मिळतोय गुटखा! | पुढारी

लोणी पोलिस ठाण्यालगत सर्रास मिळतोय गुटखा!

लोणी; पुढारी वृत्तसेवा : लोणी येथे पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. लोणीसह कोल्हार, बाभळेश्वर आदी इतर प्रवरा परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होते. गुटखा विक्रेता लोणी पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर सर्रास गुटखा विक्री करीत आहे.

कर्नाटक व गुजरात या पर राज्यातून मोठ्या प्रमाणात गुटखा खरेदी करून तो लोणी, कोल्हार, बाभळेश्वर व इतर प्रवरा परिसरासह श्रीरामपूर, कोपरगाव, शिर्डी, राहाता, संगमनेर, राहुरी या तालुक्यांमध्ये गुटखा विक्री करण्याचे प्रमाण वाढले आहे, परंतु एस. पी. राकेश ओला यांनी अवैद्य धंद्याविरुद्ध उघडपणे मोहीम सुरू केली आहे. यामुळे आता अवैद्य धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

शिर्डी, संगमनेर, कोपरगाव, राहुरी या परिसरामध्ये राकेश ओला यांनी धाडसत्र केले, परंतु लोणी येथील पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या गुटखा विक्री करणार्‍या व्यापार्‍यांवर नेमकं कोणाचा वरदहस्त आहे, असा सवाल केला जात आहे.
कोल्हार येथेसुद्धा गुटखा विक्री जोरात चालू आहे.

लोणी गुटखा विक्रेत्याविरुद्ध आत्तापर्यंत एक- दोनदा साधी कारवाई करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा व्यवसाय सुरू आहे. अनेक वेळा परिसरातील लोकांनी पोलिसांकडे तक्रार केली, परंतु यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही. पोलिस स्टेशन व अन्न भेसळ प्रशासन यांनी कुठलीही प्रकारची कारवाई केली नाही. अनेक वर्षांपासून लोणीसह कोल्हार येथील गुटख्याचा व्यवसाय बंद करा, अशी परिसरातील लोकांची मागणी आहे.

Back to top button