धक्कादायक! बिहारमध्ये भूल न देता २४ महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, वेदनेने किंचाळत सांगितली आपबिती | पुढारी

धक्कादायक! बिहारमध्ये भूल न देता २४ महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, वेदनेने किंचाळत सांगितली आपबिती

पाटणा (बिहार); पुढारी ऑनलाईन : बिहारमधील काही सार्वजनिक आरोग्य केंद्रांत धक्कादायक प्रकार घडला आहे. येथील २४ महिलांवर भूल न देता कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली. बिहारमधील खगरिया जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांत हा प्रकार घडला आहे. भूल न देता शस्त्रक्रिया केल्याने महिलांना प्रचंड वेदना सहन कराव्या लागल्या. याबाबत महिलांनी तक्रारी केल्यानंतर या घटनेच्या चौकशीचे आदेश जिल्हा दंडाधिकारी आलोक रंजन घोष यांनी दिल्याचे वृत्त द टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

“मी वेदनेने किंचाळत असताना चार जणांनी माझे हात आणि पाय घट्ट पकडले आणि डॉक्टरांनी ऑपरेशन पूर्ण केले. मला शस्त्रक्रियेनंतर काहीतरी दिले गेले ज्यामुळे मी सुन्न झाले,” अशी तक्रार कुमारी प्रतिमा या महिलेने केली आहे. तिच्यावर अलौली येथील आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया करण्यात आली. आणखी एका महिलेने सांगितले की ती संपूर्ण शस्त्रक्रियेदरम्यान शुद्धीत होती. जेव्हा शस्त्रक्रियेवेळी ब्लेडचा वापर करण्यात आला तेव्हा मला तीव्र वेदना झाल्या, असे तिने तिच्या तक्रारीत नमूद केले आहे.

राज्य सरकार पुरस्कृत एका स्वयंसेवी संस्थेतर्फे राबविण्यात आलेल्या मोहिमेत ५३ पैकी २४ महिलांवर फॅलोपियन ट्यूबच्या सर्जिकल क्लिपिंगची शस्त्रक्रिया करण्यात आली. या प्रकरणी डीएम घोष यांनी सिव्हिल सर्जनला चौकशी करून लवकर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. सिव्हिल सर्जन डॉ. अमरनाथ झा यांनी या प्रकरणी दोन आरोग्य केंद्रांच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागितले आहे. जबाबदारी निश्चित झाल्यानंतर कठोर कारवाई सुरू केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. अलौली आरोग्य केंद्राचे प्रभारी डॉ. मनीष कुमार यांनी म्हटले आहे की महिलांच्या तक्रारी आल्यानंतर ग्लोबल डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह या एनजीओला काळ्या यादीत टाकले आहे.

अररिया जिल्ह्यात २०१२ मध्ये अशीच एक घटना घडली होती. त्यावेळी दोन तासांत ५३ ग्रामीण महिलांवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली होती. महिलांचा जीव धोक्यात घालून त्यांना भूल न देता शस्त्रक्रिया केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली होती.

हे ही वाचा :

Back to top button