‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेने पायात वेदना; ‘हे’ करा उपाय | पुढारी

‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेने पायात वेदना; 'हे' करा उपाय

कॅलिफोर्निया : काही लोकांना रात्री झोपण्याच्या वेळेस तसे सकाळी उठल्यानंतर पायात प्रचंड वेदना होत असतात. अनेक प्रकारचे उपाय करूनही या वेदना कमी होण्याची कोणतीच चिन्हे दिसत नाहीत. यासंदर्भात ‘मेडिकल टुडे’ने दिलेल्या माहितीनुसार ज्यावेळी आपण नेहमीच घराच्या आत राहत असतो अथवा डायटमधून मिळणारे ‘व्हिटॅमिन डी’चे प्रमाण कमी होते. अशावेळी शरीरात असलेले कॅल्सियमचे अवशोषण हाडांमध्ये होऊ शकत नाही. यामुळेच हाडांसंबंधीच्या समस्या सुरू होऊ लागतात.

तसे पाहिल्यास ‘व्हिटॅमिन डी’चे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे स्रोत म्हणजे सूर्याची किरणे. यामुळेच या व्हिटॅमिनला ‘सनलाईट व्हिटॅमिन’ असेही म्हटले जाते. हेच व्हिटॅमिन डी हे हाडांसाठी तसेच मांसपेशीच्या कार्यासाठी महत्त्वपूर्ण असते. यामध्ये असणारे ‘इंफ्लामेट्री’ गुण हे सांधेदुखीपासून बचाव करण्यासाठी मदत करत असतात. अनेक संशोधनांतील दाव्यानुसार व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने रुमेटाईड गाठी होत असतात. यामुळे हिप्स, गुडघे आणि पायांत प्रचंड वेदना होत असतात.

ज्या लोकांच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डीचे प्रमाण कमी असते असे लोक वारंवार आजारी पडतात अथवा त्यांना सर्दी-खोकला अशा समस्या असतात. यासाठीच सर्वप्रथम या व्हिटॅमिनची शरीरात कमतरता होऊ न देणे, महत्त्वाचे ठरते. यासाठीडॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपाय योजना करणे, नियमितपणे सूर्याची किरणे अंगावर घेणे, ज्या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन डीचे प्रमाण जास्त असते, ते पदार्थ प्रामुख्याने जेवणात घेणे महत्त्वाचे ठरते.

Back to top button