तुमच्याशी ‘मन की बात’ नाही तर ‘तुमची मन की बात’ ऐकण्यास आलो : राहुल गांधी | पुढारी

तुमच्याशी 'मन की बात' नाही तर 'तुमची मन की बात' ऐकण्यास आलो : राहुल गांधी

वाशिम, पुढारी वृत्तसेवा : भारत जोडो यात्रा कन्याकुमारीपासून सुरू झाली असून श्रीनगरमध्ये जाऊनच थांबणार आहे. या पदयात्रेत दररोज हजारो लोक भेटून त्यांच्या समस्या सांगतात, तरुण मुले मुली शिक्षण घेऊन नोकरीची प्रतिक्षा करत आहेत. शेतक-याच्या शेतमलाला भाव मिळत नाही. काही राजकीय पक्षाचे नेते येतात आणि मन की बात करतात पण मी तुमची मन की बात ऐकण्यास आलो आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले आहेत.

जांबरून फाटा येथून सकाळी पदयात्रेला सुरूवात झाली. तर वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथे पदयात्रेची सांगता चौकसभेने झाली. जनसमुदायाला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी लोकांना जोडण्याचे काम केले. सामाजिक सौहार्द निर्माण करण्याचे काम केले, या महापुरुषांनी जाती धर्मात भांडणे लावले नाहीत, द्वेष पसरवला नाही. आम्ही सुद्धा या पदयात्रेच्या माध्यमातून त्या॔नी घालून दिलेल्या मार्गानेच भारत जोडण्याचे काम करत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाचे रक्षण करण्यासाठी ही यात्रा आहे.
बेरोजगारीने तरुणवर्ग चिंतेत आहे. शेतमाला भाव मिळत नाही म्हणून शेतकरी संकटात आहे.

मोदी सरकारच्या राजवटीत कोणताही घटक समाधानी नाही. देशात समस्या मोठ्या आहेत पण नरेंद्र मोदी त्याकडे लक्ष देत नाहीत. दोन तीन लोकांसाठीच ते काम करतात. नोटबंदी व जीएसटीने सर्वांना उद्ध्वस्त केले आहे. काही मोजक्या लोकांचे मात्र भले केले आहे. आम्हाला मिळणारे तुमचे प्रेम व शुभेच्छा भरभरून मिळत आहेत आणि या ऊर्जेमुळेच ३५०० किलोमीटरच काय, पण १० हजार किलोमीटरचे अंतरही आम्ही चालत जाऊ, असा विश्वास राहुल गांधी व्यक्त केला.

या सभेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी आशिष दुआ, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, आ. राजेश राठोड, आ. अमित झनक, आ. डॉ. प्रज्ञा सातव, सरचिटणीस, देवानंद पवार आदी उपस्थित होते.

हेही वाचलंत का?

Back to top button