मुलांचे लसीकरण वाढवण्याबराेबरच स्वतंत्र ओपीडी सुरू : तानाजी सावंत | पुढारी

मुलांचे लसीकरण वाढवण्याबराेबरच स्वतंत्र ओपीडी सुरू : तानाजी सावंत

मुंबई, पुढारी वृत्‍तसेवा : शहरातील काही भागात राबविण्यात येणाऱ्या गोवर प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मुलांचे लसीकरण वाढवणे, स्वतंत्र ओपीडी आणि सर्व्हेक्षण करण्यात यावे. तसेच संशयित लक्षणे असणा-या मुलांवर लक्ष ठेवावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या.

डॉ. संजीव कुमार म्‍हणाले की, मुंबई शहरातील आठ वॉर्डमध्ये मुलांना गोवरची लक्षणे आहेत. या भागात पथकांमार्फत मुलांचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. लक्षणे आढळल्यास मुलांना तत्काळ दवाखान्यात दाखल करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुमारे दहा हजार मुलांना लसीकरण केले आहे. येत्या काही दिवसांत सुमारे पन्नास हजारांहून अधिक मुलांना लसीकरण करण्याचे नियोजन केले आहे.

दरम्‍यान, सावंत म्‍हणाले की, संबंधित आठ वॉर्डमध्ये विशेष पथकांच्याव्दारे सर्व्हेक्षण करा. यासाठी आवश्यक असल्यास सार्वजनिक आरोग्य विभागाचे मनुष्यबळ पुरवले जाईल. मुंबईबरोबरच गोवरची लक्षणे आढळलेल्या मालेगाव आणि भिवंडी निजामपूर महापालिका परिसरातही सर्व्हेक्षण करावे. तेथेही लसीकरण वाढवा. मुलांचे लसीकरण करण्यासाठी पालकांचे समुपदेशन करा. समुपदेशन करण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात यावी. यावेळी डॉ. मंगला गोमारे यांनी मुंबई महापालिका राबवत असलेल्या प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती दिली.

या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव संजय खंदारे, महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक आणि आयुक्त डॉ. तुकाराम मुंढे, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ज्ञ‍ डॉ. राहुल शिंपी, राज्य साथरोग अधिकारी डॉ प्रदीप आवटे आदी उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button