पुणे : सराइताकडून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न | पुढारी

पुणे : सराइताकडून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पूर्ववैमनस्यातून, तसेच परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी एका तरुणाच्या खुनाचा प्रयत्न करणार्‍या सराइताला समर्थ पोलिसांनी अटक केली. सागर भुजंग नायडू (वय 27, रा. सदानंदनगर, सोमवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर, त्याने केलेल्या मारहाणीत शाहरूख हंजगीकर (वय 30, रा. सदानंदनगर, सोमवार पेठ) हा तरुण जखमी झाला .

या प्रकरणी हंजगीकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी नायडू याच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि.6) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास सौदामिनी सभागृहासमोरील सार्वजनिक रोडवर सदाआनंदनगर सोमवार पेठेत घडली आहे.  फिर्यादी हंजगीकर हे त्यांच्या मित्रासोबत रिक्षामध्ये गप्पा मारत थांबले होते.

त्या वेळी नायडू हा तेथे आला आणि हातातील कोयता फिरवत मोठमोठ्याने ओरडत परिसरात दहशत निर्माण केली आणि फिर्यादीला लाकडी दांडक्याने मारहाण करून जबर जखमी करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून आरोपी नायडू याला अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक लोणारे करीत आहेत.

Back to top button