Team India : सेमी फायनलपूर्वी टीम इंडियासमोर मोठे संकट, ‘या’ खेळाडूला… | पुढारी

Team India : सेमी फायनलपूर्वी टीम इंडियासमोर मोठे संकट, ‘या’ खेळाडूला...

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाने (Team India) टी-20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत (T20 World Cup Semi Final) प्रवेश केला आहे. आता भारतीय संघाला अंतिम फेरीत जाण्यासाठी इंग्लंडवर मात करावी लागणार आहे. भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात गुरुवारी, 10 नोव्हेंबरला अॅडलेड येथे सामना रंगणार आहे. टीम इंडियाशिवाय पाकिस्ताननेही ग्रुप 2 मधून अंतिम चार संघांमध्ये स्थान पक्के केले आहे. त्याचबरोबर इंग्लंड आणि न्यूझीलंड संघांनीही ग्रुप 1 मधून उपांत्य फेरीचे तिकीट बुक केले आहे. दरम्यान, टीम इंडिया (Team India) आता इंग्लंडविरुद्ध नव्याने रणनीती आखत आहे. इंग्लिश संघाला पराभवाची धुळ चारून फायनल गाठण्याकडे टीमचे ध्येय आहे. दरम्यान, टीम इंडियाची सर्वात मोठी अडचण कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) फॉर्म आहे. हिटमॅन म्हणून ओळख असेलेल्या या फलंदाजाला अजूनही सूर गवलेला नाही. उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यात रोहित शर्माच्या बॅट धावांचा पाऊस पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हिटमॅनकडून पाच डावांत 17 च्या सरासरीने केवळ 89 धावा

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्मा टीम इंडियाचे (Team India) नेतृत्व करत आहे. सलामीला येत त्याने आतापर्यंतच्या पाच डावांत केवळ 89 धावा केल्या असून त्याची सरासरी फक्त 17 च्या आसपास आहे. रोहितचा हिटमॅन अवतार केवळ नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात दिसला आहे. त्या सामनयात त्याने अर्धशतक झळकावले. पण पुढच्या सामन्यात त्याची बॅट पुन्हा शांत झाली. रोहित हा ज्या प्रकारचा फलंदाज आहे, त्यावरून त्याची मोठ्या सामन्यांमध्ये बॅट तळपेल आणि संघाच्या विजयातही तो मोठी भूमिका बजावेल, अशी अपेक्षा चाहत्यांसह तज्ज्ञांना आहे. दरम्यान, माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हे दोघे जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. त्यातच आता केएल राहुलनेही (KL Rahul) फॉर्ममध्ये येण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे रोहित शर्मा सुद्धा फॉर्ममध्ये येताच संघ अधिक मजबूत होईल असे अनेकांचे म्हणणे आहे.

भारतीय ओपनर्सना 50 धावांची सलामी देण्यात अपयशी

मोठी खेळी करण्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) अपयशी ठरला असला तरी भारतीय संघाने सुपर 12 फेरीतील पाचपैकी चार सामने जिंकले. पण एकाही सामन्यात भारतीय ओपनर्सना 50 धावांची सलामी देता आलेली नाही. पहिली विकेट लवकर पडणे हे संघासाठी धोक्याचे आहे. रोहित किंवा राहुल लवकर बाद झाल्यानंतर विराट कोहलीला लवकर क्रीजवर उतरावे लागते. त्याच्यावर दबाव वाढतो. सुदैवाने दबावातही खेळताना कोहलीने या स्पर्धेत तीन अर्धेशतके झकाळवली असून संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका वठवली आहे. त्यामुळे कोहलीचा हा फॉर्म असा कायम राहिल्यास टीम इंडिया केवळ अंतिम फेरीतच प्रवेश करणार नाही, तर फायनल जिंकून दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप उंचावू शकतो, हे निश्चित. आता इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत सलामीवीर रोहित शर्मा कसा खेळतो हे पाहावे लागणार आहे.

Back to top button