पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 WC Semi final : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणा-या टीम इंडियाने टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता उपांत्य फेरीत रोहित ब्रिगेडचा मुकाबला इंग्लंड संघाशी होणार आहे. हा सामना गुरुवारी (10 नोव्हेंबर) अॅडलेडच्या मैदानावर रंगणार असून यासाठी भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी विशेष तयारी सुरू केली आहे. यासोबतच द्रविड यांनी या सामन्यात मोठ्या बदलांचे संकेतही दिले आहेत.
अॅडलेडमधील परिस्थितीनुसार भारतीय संघात आवश्यक बदल केले जातील, असे द्रविड यांनी म्हटले आहे. अशा परिस्थितीत, लेग-स्पिनर युझवेंद्र चहलला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळू शकते, कारण अॅडलेडची खेळपट्टी सहसा स्लोअर बॉलर्सना उपयुक्त असते. यासोबतच अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकही संघात पुनरागमन करू शकतो. त्यामुळे ऋषभ पंतला पुन्हा बाहेर बसावे लागेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
द्रविड यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, 'मला वाटते की आम्ही आमच्या 15 सदस्यीय संघासाठी पूर्णपणे मोकळे आहोत. मला विश्वास आहे की, या 15 सदस्यीय संघात जो कोणी सामील असेल तो आम्हाला कमकुवत करणार नाही. मी पुन्हा तेच म्हणेन की आपण तिथे (अॅडलेड) जाऊन पाहू. मी आज (अॅडलेडच्या मैदानावर) काही सामने पाहिले आणि मला माहित आहे की तेथे ट्रॅक थोडा संथ आहे. ग्रिप्ड आहे. थोडेसे वळण देखील मिळत आहे. अॅडलेडमध्ये आम्ही पूर्णपणे नवीन खेळपट्टीवर खेळणार आहोत.
भारतीय कोच म्हणाले, 'आम्ही बांगलादेशविरुद्ध ज्या खेळपट्टीवर खेळलो, खरे सांगायचे तर तेथे फिरकी नव्हती. ही विकेट वेगळ्या प्रकारची होती. अॅडलेडमध्येही अशीच खेळपट्टी असेल. माझं असं मत आहे की, मी सामन्यानंतर इथे बसून तिथे काय होईल याचा अंदाज लावू शकत नाही. आमच्याकडे उपांत्य समन्यापूर्वी काही दिवसांचा अवधी आहे. आम्ही तिथे (ॲडलेड) जाऊन खेळपट्टी पाहू आणि त्यानंतर काय करता येईल याचा विचार करू,' असेही द्रवीड यांनी स्पष्ट केले.
द्रविड म्हणाले, 'जर ॲडलेडची खेळपट्टी संथ असेल, तर आम्ही त्या परिस्थितीनुसार खेळू. थोडी वेगळी खेळपट्टी असेल असे वाटत असेल तर त्या सामन्यासाठी नवी रणनिती बनवून संघाची निवड करणे आवश्यक ठरेल,' असे त्यांनी सांगितले. त्यामुळे अॅडलेडच्या सध्याच्या परिस्थिती आणि खेळपट्टीनुसार उपांत्य सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 संघ व्यवस्थापन निवडेल असे द्रविड यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे, असे काही तज्ञांचे म्हणणे आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
स्टँडबाय खेळाडू : श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.