पुणे : सासर्‍याला बेदम मारहाण; जावयासह तिघांवर गुन्हा | पुढारी

पुणे : सासर्‍याला बेदम मारहाण; जावयासह तिघांवर गुन्हा

पुणे : पत्नी नांदायला येत नसल्यावरून जावयाने सासर्‍याला दुकानात घुसून बेदम मारहाण केल्याची घटना घडली. रास्ता पेठेत या मारहाणीचा थरार वर्दळीच्या वेळीच घडला असून, यात सासरे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी सासू अनमोल भटिजा (वय 48) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यावरून जावई स्वप्नील चव्हाण याच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर अनमोल यांचे पती यात गंभीर जखमी झाले आहेत. तक्रारदार यांच्या मुलीसोबत स्वप्नील याने प्रेमविवाह केलेला आहे, पण तो काहीच कामधंदा करत नसल्याने पत्नी माहेरी आलेली असून, तिने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. ती नांदायला येत नाही, याचा राग स्वप्नीलच्या मनात होता.

दरम्यान, तक्रारदारांचे रास्ता पेठेतील अपोलो टॉकीजजवळ दुकान आहे. काल सायंकाळी स्वप्नील व त्याचे साथीदार दुकानात गेले व त्यांनी सासर्‍यांना बेदम मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर स्वप्नील त्यांच्या घरी गेला व पत्नी आणि सासूलाही मारहाण करून त्यांना शिवीगाळ केली. पुढील तपास सहायक निरीक्षक माळी करत आहेत.

 

 

 

 

Back to top button