विठुरायाला कल्याण येथील महिला भाविकांकडून १९ तोळे सोन्याचा चंदन हार अर्पण | पुढारी

विठुरायाला कल्याण येथील महिला भाविकांकडून १९ तोळे सोन्याचा चंदन हार अर्पण

पंढरपूर, पुढारी वृत्तसेवा : दोन वर्षांच्या कोरोनानंतर कार्तिकी यात्रा निर्बंध मुक्त पार पडत आहे. यात्रेनिमित्‍त मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले आहेत. दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून विठ्ठल रुक्मिणीस सोन्याचे दागिणे अर्पण केले जात आहेत. त्यामुळे विठुरायाच्या खजिन्यात सोने चांदीच्या दागिन्यांची भर पडत आहे.

दरम्‍यान, कल्याण येथील विठ्ठल भक्त वंदना म्हात्रे यांनी 11 लाख रुपये किंमतीचा 19 तोळे वजनाचा सोन्याचा चंदनहार‌ विठुरायाला अर्पण केला आहे. कल्याण येथील विठ्ठल भक्त वंदना म्हात्रे या पंढरपूरात सहकुटुंब आल्या होत्या. त्यांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यापुर्वी मंदिर समितीच्या व्यवस्थापकांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी विठ्ठलाच्या चरणी सोन्याचा चंदन हार अर्पण करावयाचे सांगितले.

अत्यंत सुबक कलाकुसर असलेला सोन्याचा चंदन हार म्हात्रे कुटुंबियांनी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर हा हार विठ्ठलास अर्पण करण्यात आला. यावेळी भरत महाराज अलिबागकर, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, वंदना म्हात्रे आदी उपस्थित होते. मंदिर समितीच्यावतीने वंदना म्हात्रे यांचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचा  

Back to top button