चार वर्षे झाली तरी रस्ता पूर्ण होईना ; श्रीरामनगर ते शिवापूर रस्त्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष | पुढारी

चार वर्षे झाली तरी रस्ता पूर्ण होईना ; श्रीरामनगर ते शिवापूर रस्त्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

खेड शिवापूर : पुढारी वृत्तसेवा : हायब—ीड अ‍ॅन्युटीअंतर्गत कोंढणपूर फाटा ते सिंहगड दरम्यानच्या रस्त्याचे काम नोव्हेंबर 2018 मध्ये सुरू करण्यात आले. त्यास आता चार वर्षे झाली तरीही श्रीरामनगर ते शिवापूर या दरम्यानचा रस्ता अजूनही अपूर्ण आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघात होत आहेत. तसेच कल्याण, राहाटवडे, मोरदरी, कोंढणपूर, शिवतारेवाडी, आर्वी (ता. हवेली), कुसगाव, रांजे (ता. भोर) या भागातील नागरिकांना रस्त्याच्या दुर्दशेमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.

कोंढणपूर फाटा ते सिंहगड या दरम्यानच्या रस्त्याचे काम नोव्हेंबर 2018 पासून जवळपास फेब—ुवारी 2021 पर्यंत सुरू होते. याच दरम्यान श्रीरामनगर ते शिवापूर हा सुमारे दीड किलोमीटरचा रस्ता काँक्रीटीकरण ऐवजी डांबरी करण्यात आला. त्यामुळे सदर रस्त्याचे काम नागरिकांनी बंद पाडले. सदर काम पुन्हा सुरू झाले, परंतु त्याचा वेग संथ होता.  याबाबत दै. पुढारीने वृत्त प्रसिद्धस दिले. त्यानंतर काम जलदगतीने सुरू झाले. मात्र, ते पूर्णत्वास गेले नाही.

या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पर्यटक व स्थानिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. या रस्त्याबाबत रास्ता रोको करण्याचा इशारा शिवापूरचे सरपंच सतीश दिघे, उपसरपंच राजू सट्टे, माजी उपसरपंच अण्णा दिघे, तंटामुक्ती अध्यक्ष उमेश दिघे यांच्यासह शिवगंगा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.  रस्त्याचा नवीन प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही. लवकरात लवकर सदर खड्डे बुजविण्यात येतील, असे सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता अजय भोसले यांनी सांगितले.

Back to top button