कोल्हापूर : मासेमारी भोवली; चार दिवसांवर लग्न असलेल्या वराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू | पुढारी

कोल्हापूर : मासेमारी भोवली; चार दिवसांवर लग्न असलेल्या वराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

धामोड : पुढारी वृत्तसेवा : धामोड पैकी लाडवाडी (ता. राधानगरी) येथे विद्युत करंट नदीत सोडून मासेमारी करताना चाफोडी पैका दोनवडी (ता. करवीर) येथील अभिजित हळदे (वय २२) या युवकाचा मृत्यू झाला. अभिजितचा विवाह अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला होता. परंतु, त्याच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अभिजित हळदे आणि त्याचे साथीदार लाडवाडी येथे तुळशी नदीत विद्युत करंट सोडून मासेमारी करत होते. नदीतील पाण्यात करंट सोडला असता एक मोठ्ठा मासा पाण्यातून बाहेर आला. त्याला पकडण्यासाठी संबंधित युवकाने पाण्यात उडी घेतली. त्यामुळे त्याला विजेचा जोरदार झटका बसला व पाण्यात तडफडू लागला.

यावेळी त्याच्या साथीदारांनी करंट बंद करून त्याला बाहेर काढले व उपचारासाठी धामोड येथे आणले. मात्र. त्याची प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात हलवले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषीत केले. संबंधित घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.

विजेचा करंट व विषारी केमिकलचा वापर करून मासेमारीच्या प्रकारात वाढ झाली असून यावर कोणाचेही निर्बंध नाही. विजेच्या करंटने मासेमारी करणाऱ्यांवर कडक कारवाई करून त्यांना वेळीच आळा घालण्याची मागणी धामोड परिसरातून होत आहे.

हळद लागण्यापूर्वी मृत्यूच्या दाढेत

दहा वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाल्याने अभिजित व त्याची आई मामाकडे दोनवडी येथे राहत होते. अभिजित याचा विवाह ठरला होता . व अवघ्या चार दिवसावर विवाह सोहळा येऊन ठेपला असतानाच अभिजितचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button