काष्टी : वंचितांच्या घरी दिवाळीत शिमगा! रेशनपासून 15 हजार कुटुंब वंचित | पुढारी

काष्टी : वंचितांच्या घरी दिवाळीत शिमगा! रेशनपासून 15 हजार कुटुंब वंचित

काष्टी : पुढारी वृत्तसेवा :  रेशनकार्डवर 12 अंकी कोड नसल्याने गावातील स्वस्त धान्य दुकानात बोटाचे ठसे जुळले नाही, म्हणून स्वस्त धान्य दुकानात रेशनवर मिळणारा जीवनावश्यक धान्य सामान्य कुटुंबातील लोकांना मिळाले नाही. यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर तालुक्यातील सुमारे 15 हजार कुटुंब संबंधितांच्या हलगर्जीपणामुळे वंचित राहिले आहेत. याची दखल जिल्हाअधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी घ्यावी, अशी मागणी काष्टीतील राहुल नलवडे, सुधाकर पाचपुते यांनी केली.

गेल्या सहा महिन्यांपासून रेशनचे धान्य मिळावे म्हणून गावातील स्वस्त धान्य दुकानात हेलपाटे मारावे लागतात. तेथे गेल्यानंतर दुकानदार सांगतात, ‘सतुमच्या रेशनकार्डला 12 अंकी ऑनलाईन कोड नंबर नाही, तो मिळाला असेल तर रेशनचा माल, तुम्हाला मिळेल अन्यथा मिळणार नाही.,’ तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात 12 अंकी कोड मिळण्यासाठी त्यांना लागणार्‍या सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही पुरवठा विभागाकडून कारवाई होताना दिसत नाही. अनेक प्रकरणे पुरवठा विभागातून गहाळ झाली आहेत, तर प्रत्येक गावांत महसूलमार्फत शिबीर घेऊन जमा कागदपत्रे कर्मचार्‍यांना सापडत नाहीत.

विचारणा केली, तर उद्धट उत्तरे दिली जातात. जी प्रकरणे सापडली त्यावर पुरवठा विभागातील कर्मचार्‍यांनी रेशनकार्डवर बोगस 12 अंकी कोड नंबर देवून तालुक्यातील सामान्य लोकांचे समाधान केले; परंतु प्रत्यक्ष रेशन दुकानदाराकडे धान्य घेण्यासाठी गेल्यानंतर 12 अंकी कोड जुळाले नाही. परिणामी या लोकांना धान्य मिळाले नाही. दिलेला कोड खोटा आहे, असे सांगितले जाते. काही प्रकरणावर तहसीलदारांच्या सह्या नसल्याने अशी सुमारे दिड हजार प्रकरणे पुरवठा विभागात पेंडिंग पडली आहे.

‘कुटुंब धान्यापासून वंचित नको’
दिवाळीचा सण चालू आहे. प्रत्येकाच्या घरात कुटुंबात दिवाळी साजरी झाली पाहिजे. तालुक्यातील 15 हजार प्रकरणे पुरवठा विभागात जर पेंडिंग असतील तर ही बाब गंभीर आहे. महसूल विभागातील कर्मचार्‍यांनी हा विषय गाभीर्याने घेऊन ताबडतोब सर्व प्रकरणे पडताळून योग्य निर्णय घ्यावा, यामध्ये एकही कुटुंब धान्यापासून वंचित राहाता कामा नये, अन्यथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे तक्रार करून दोषी अधिकार्‍यांवर कार्यवाही केली जाईल, असे आमदार बबनराव पाचपुते यांनी सांगितले.

शिबीर घेऊन फक्त देखावा का?
महसूल विभागामार्फत तालुक्यातील वेगवेगळ्या गावात शिबीर घेऊन सामान्य लोकांकडून कागदपत्रे जमा करून घेतली; परंतु त्यातील एकही प्रकरण निकाली नाही. मग स्वतःच्या अमृतमहोत्सानिमित्त गरिब सामान्य लोकांसाठी घेतलेले शिबीर फक्त देखावा का, असा सवाल कुंडलिक गवळी यांनी केला.

Back to top button