चंद्रपूर : मांजरी परिसरात वाघाच्या हल्यात युवकाचा मृत्यू; पाच पट्टेदार वाघांचे वास्तव्य | पुढारी

चंद्रपूर : मांजरी परिसरात वाघाच्या हल्यात युवकाचा मृत्यू; पाच पट्टेदार वाघांचे वास्तव्य

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर येथील मांजरी गावाशेजारी शौचास गेलेल्या एका 38 वर्षे युवकावर पट्टेदार वाघाने हल्ला केला. यामध्ये युवचा जागीच मृत्‍यू झाला आहे. ही घटना काल सोमवारी रात्री नऊच्या सुमारास हनुमान मंदिर परिसरात घडली. दिपू सियाराम सिंग महतो असे मृतक युवकाचे नाव आहे. मागील काही दिवसांपासून या परिसरात वाघांची दहशत आहे. वन विभागाने अद्याप उपायोजनांची पाऊले न उचलल्याने युवकाचा मृत्यू झाला असा आरोप नागरिकांनी केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, दिपू सियाराम सिंग महतो हा माजरी येथील रहिवासी होता. सोमवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास गावाशेजारील झुडपी परिसरात तो शौचासाठी गेला होता. दरम्यान या परिसरात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने युवकावर हल्ला केला. त्यानंतर त्याला फरफटत झुडपी जंगलात घेऊन गेला. काही नागरिकांनी मदतीसाठी धावून येत वाघाच्या हल्ल्यातून त्या युवकाला सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतु युवकाला वाघाने झुडपी जंगलात फरफटत नेले. जंगल परिसरात नागरिकांनी युवकाची शोधाशोध केली. अखेर युवकाचा मृतदेह आढळून आला.

सदर घटनेची माहिती पोलिस व वनाधिकाऱ्यांना देण्यात आली. पोलिस व क्षेत्र सहाय्यक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी क्षेत्र सहाय्यक यांनी मृतकाचे कुटुंबीयांना मदत केली जाणार असल्याचे आश्वासन दिले.

माजरी परिसरात पाच वाघांची वास्तव

माजरी गावालगत पाच वाघांचे वास्तव्य आहे. त्यामुळे या परिसरात दहशत निर्माण झाली आहे. याच परिसरात वेकोलीच्या खाणी आहेत. खासगी तसेच अन्य कर्मचारी या परिसरातून रात्री बेरात्री ये-जा करतात. वाघाच्या दहशतीमुळे त्यांच्या जिवितास धोका आहे. अनेकदा या वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली, परंतु वनविभागाने वाघाच्या बंदोबस्तासाठी उपाय योजना केल्या नाहीत.

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व अधिकाऱ्यांसोबत ही घटना घडल्यानंतर एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत वाघापासून होणारे हल्ले लक्षात घेता, उपाय योजनांवर चर्चा करून उपाय योजना करण्यात येणार असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली आहे.

हे ही वाचा 

अतिवृष्टी नुकसानीचा प्रश्न केंद्र, राज्य शासनाकडे मांडणार; शरद पवार यांचे प्रतिपादन

नाव राजा शेवंती; पण दिवाळीतही पुसेना कोणी! 

मेहबूबा मुफ्ती यांच्यावर भाजपचा पलटवार, ऋषी सूनक यांचे कौतुक करायला हवे…

Back to top button