ठाणे जिल्ह्यात सात उमेदवारांनी भरले अर्ज | पुढारी

ठाणे जिल्ह्यात सात उमेदवारांनी भरले अर्ज

ठाणे : पुढारी वृत्तसेवा :  रखरखत्या उन्हात जोरदार शक्तिप्रदर्शन करीत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, शिवसेना उबाठा गटाचे राजन विचारे यांनी तिसर्‍यांदा उमेदवारी अर्ज भरले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळ्या मामा उर्फ सुरेश पाटील यांच्यासह अन्य चार अशा सात उमेदवारांनी आज सोमवारचा मुहूर्त साधत नामनिर्दशन अर्ज दाखल केले. दुसरीकडे ठाण्याची जागा कोण लढविणार? आणि उमदेवार कोण असेल हे अद्याप गुलदस्त्यात असल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
ठाणे लोकसभा मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. खासदारकीच्या विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी विचारे यांनी सर्वप्रथम कोपिनेश्वर मंदिरात जाऊन महादेव आणि गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर दिवंगत आनंद दिघे यांच्या समाधीस्थळावर जाऊन गुरूंचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर शिवसेने नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, माजी आमदार मुझफ्फर हुसेन, वरुण सरदेसाई, काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्यासह जोरदार शक्तिप्रदर्शन करीत विचारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
ओबीसी जनमोर्चाचे मल्लिकार्जुन सायबन्ना पुजारे यांनी अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केला. तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब विचार आणि सेवा मंचातर्फे उमेदवारी अर्ज घेण्यात आला असून अपक्ष 10, दिल्ली जनता पार्टी 3, लोकराज्य पक्ष 1, हिंदू समाज पार्टी 3,  1, बहुजन समाज पार्टी 2, भारतीय राष्ट्रवादी पार्टी 1 आदी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी 21 नामनिर्देशन पत्रे घेऊन गेले आहेत.
भिवंडी लोकसभा मतदार संघामध्ये भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी देखील जोरदार शक्तीप्रदर्शन करीत नामनिर्दशनपत्र दाखल केले. तर एमआयएमसह अन्य 8 पक्ष आणि अपक्षांच्या प्रतिनिधींनी 28 नामनिर्देश अर्ज विकत घेतले आहेत.  पहिल्या दिवशी एकूण 54 नामनिर्देशनपत्रे आणि दुसर्‍या दिवशी 28 असे एकूण 82 नामनिर्देशन पत्र देण्यात आली आहेत.
कल्याण लोकसभा मतदार संघात आज तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.  बहुजन समाज पार्टीच्या (आंबेडकर) सुशीला कांबळे,  अमित उपाध्याय आणि  डॉ. सचिन पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. तर 19 उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनीनी एकूण 28 नामनिर्देशनपत्र विकत घेतली आहेत.

गुजरातच्या आदेशानंतरच उमेदवारी समजणार ः आदित्य ठाकरे

 ठाणे लोकसभेची उमेदवारी ही भाजपला मिळणार की, मिंदेना मिळणार हे गुजरातवरून आदेश आल्यानंतरच समजणार, अशी जोरदार टीका शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली. ही लढाई बाप आणि पक्ष चोरणार्‍या, संविधान बदलणार्‍या तसेच महाराष्ट्राला दिल्लीत झुकवणार्‍यांच्या विरोधात असल्याचे ते म्हणाले.

दिल्लीपर्यंत आवाज पोहचवण्याचा प्रयत्न करणार!

राजन विचारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भर उन्हात कारकर्त्यांची गर्दी झाल्याने हे शक्तिप्रदर्शन नव्हे तर हे प्रेम असल्याचे ठाकरे म्हणाले. शिवसेना आणि ठाण्याचे जुने नाते असून आम्ही जनतेचा आवाज दिल्लीपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात शक्तिप्रदर्शन

महविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी आपल्या प्रचारात बाजी मारली आहे. राज्यात ठाणे लोकसभेला महत्त्व प्राप्त झाल्याने महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजन विचारे यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्धार केला आहे. राजन विचारे यंदा हॅट्रिक करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेली 10 वर्ष काम करण्याची संधी मला दिली. मी अनेक विकास कामे केली आहेत. काही कामे प्रगतीपथावर आहेत. यावेळी मतदार मला काम करण्याची संधी देतील याची खात्री आहे.
-राजन विचारे
यंदा निष्ठावान वाघाची आणि गद्दारांची लढाई आहे, सर्वात जास्त लीड घेतल्या शिवाय राहणार नाही. दिघे साहेबांच्या ठाण्यात दाखवून देणार गद्दारीला क्षमा नाही.
-वरुण सरदेसाई
आम्ही बाळासाहेबांचे कट्टर समर्थक आहेत. संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. ही लढाई निष्ठावंतांची आहे. ठाकरे यांच्यावर प्रेम करणार्‍यांची आहे.
-मुजफ्फर हुसेन
मोदी महत्त्वाचे मुद्दे बोलत नाहीत. त्यांनी 10 वर्ष फक्त फसवणूक केली आहे. जनता मूर्ख आहे असे त्यांना  वाटत आहे. विकासाचे विषय बाजूला ठेऊन हिंदू-मुस्लिम सुरू केले आहे. 6 महिन्यांत  सरकार बदलणार आहे. अति जास्त करू नका. मर्यादेच्या बाहेर जाऊन वागाल तर आम्ही पण लक्षात ठेवू, काय गोळ्या घालायच्या आहेत त्या आताच घाला. आम्ही गांधींची औलाद आहोत.
-जितेंद्र आव्हाड

Back to top button