

पुणे, पुढारी वृत्तसेवा: दिवाळीनिमित्त केल्या जाणार्या सजावटीत शेवंतीची फुले हमखास लागतात. मात्र दरवर्षी फूलबाजारात मुबलक
प्रमाणात उपलब्ध असणार्या 'राजा शेवंती'ची आवक यंदा खराब हवामानामुळे केवळ दहा टक्के झाली. लांबलेल्या पावसामुळे फुलांच्या दर्जातही मोठी घसरण झाल्याने दिवाळी असूनही कोणी खरेदीसाठी उत्सुक नसल्याचे दिसून आले. त्यामुळे 'राजा शेवंती'तील राजेपण केवळ नावातच राहिल्याचे दिसून आले.
जिल्ह्यातील यवत आणि सोलापूरमधील माळशिरस भागात राजा शेवंतीची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. दिवाळीच्या अनुषंगाने शेतकरी राजा शेवंतीची लागवड करतात. एप्रिल ते मे दरम्यान लागवड केलेल्या झाडांद्वारे नवरात्रीपासून फुले येण्यास सुरुवात होते. दसरा त्यापाठोपाठ दिवाळीत मोठ्या प्रमाणात राजा शेवंतीची फुले बाजारात दाखल होतात. यंदा उशिरापर्यंत लांबलेला पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम राजा शेवंतीच्या उत्पादनावर झाला. जिल्ह्यातील बहुतांश भागात राजा शेवंतीच्या झाडांना कळ्याच आल्या नाहीत, ज्याठिकाणी आल्या त्या उमलल्या नाहीत. त्यामुळे, उत्पादनात घट होऊन त्याचा परिणाम बाजारातील आवक घटण्यावर झाल्याचे सांगण्यात आले. गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक फुलबाजारात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राजा शेवंतीची दररोज 1 लाख किलोंची इतकी आवक होते. यंदा ही आवक अवघी 10 ते 15 हजार किलोंवर आली आहे. त्यात पावसाच्या जोरदार हजेरीमुळे शेवंतीच्या प्रतवारीतही घसरण झाली आहे. त्यामुळे, आवक कमी असूनही दिवाळीच्या काळात राजा शेवंतीला कमी दरावरच समाधान मानावे लागल्याचे व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले.
दसरा व दिवाळीच्या अनुषंगाने दीड एकरावर राजा शेवंतीची लागवड केली आहे. एरवी दररोजची एक टन याप्रमाणे दिवाळीपूर्वी तीन दिवसांत 3 टन फुले विक्रीसाठी घेऊन येत होतो. याद्वारे सरासरी तीन लाखांचे उत्पन्न मिळत होते. यंदा दररोज अवघी 50 ते 100 किलो फुले निघत आहेत. यंदा दसर्यापाठोपाठ दिवाळी 'राजा शेवंती'विना गेली आहे.
– अप्पा गोराडे, शेतकरी, यवतलहरी हवामानामुळे यंदा 'राजा शेवंती'च्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहा टक्केही उत्पादन अथवा उत्पन्न मिळाले नाही. मागील वर्षी 20 गुठ्यांतून तीन दिवसांत बाराशे ते तेराशे किलो फुले बाजारात विक्रीसाठी आणली होती. यंदा अवघी शंभर किलो फुले निघाली आहेत.
– तुषार दोरगे, शेतकरी, यवत