मेहबूबा मुफ्ती यांच्यावर भाजपचा पलटवार, ऋषी सूनक यांचे कौतुक करायला हवे… | पुढारी

मेहबूबा मुफ्ती यांच्यावर भाजपचा पलटवार, ऋषी सूनक यांचे कौतुक करायला हवे...

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाच्या ऋषी सूनक यांची निवड झाल्यानंतर पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. त्याला भाजपचे वरिष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल सूनक यांचे कौतुक करणे गरजेचे आहे. दुर्दैवाने भारतातले काही नेते यावरूनही राजकारण करु पाहत आहेत, असे प्रसाद यांनी म्हटले आहे.

मेहबुबा मुफ्ती यांनी सूनक यांची पंतप्रधान पदावर नियुक्ती झाल्याचा संदर्भ देत भारत अजून सीएए/एनआरसीमध्ये अडकला असल्याची टीका केली होती. त्याला उत्तर देताना रविशंकर प्रसाद यांनी मेहबुबांनी काश्मीरचे मुख्यमंत्रीपद तेथील अल्पसंख्याक नेत्याला देऊन दाखवावे, असे आव्हान दिले आहे. ऋषी सूनक यांची निवड झाल्यापासून बहुसंख्याकवादाविरोधात असलेले काही नेते जास्तच सक्रिय झाले आहेत. डॉ. ए. जी. अब्दुल कलाम यांनी देशाचे राष्ट्रपती म्हणून, डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान म्हणून काम पाहिलेले आहे. तर सध्या आदिवासी नेत्या द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती म्हणून कार्यरत आहेत. जे सगळे काही नेते सोयीस्करपणे विसरले आहेत, असा टोला प्रसाद यांनी लगावला.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनीही सूनक यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा :

Back to top button