कोल्हापूर : आजरा तालुक्यातील आल्याचीवाडीत विवाहितेचा गळा चिरून खून | पुढारी

कोल्हापूर : आजरा तालुक्यातील आल्याचीवाडीत विवाहितेचा गळा चिरून खून

आजरा ; पुढारी वृत्तसेवा : गवत आणण्यासाठी शेताकडे गेलेल्या सौ. लता महादेव परीट (वय 45, रा. आल्याचीवाडी, ता. आजरा) या विवाहितेचा मृतदेह धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आल्याचे शेतामध्ये आढळून आले. आजरा पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे. गळा चिरून खून केल्याच्या घटनेने आल्याचीवाडी सह परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

सौ. परीट सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास जनावरांकरिता गवत आणण्यासाठी गावापासून जवळच असणार्‍या शेतामध्ये गेल्या होत्या. एक भारा टाकून परत गवत आणण्यासाठी गेलेल्या परीट दुपारी तीन वाजेपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांसह स्थानिक नागरिकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोध घेत असताना शेतामध्ये त्यांच्या फुटलेल्या बांगड्या व मंगळसूत्र आढळून आले.

फरफटत नेल्याच्या खुणांवरून या परिसरामध्ये अधिक शोध घेतला असता उसामध्ये विवाहितेचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला.

मृतदेह दिसू नये म्हणून मृतदेहावर गवत व उसाचा पाला टाकून मृतदेह झाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

शेतकरी कुटुंबातील लता परीट यांचा गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला खून झाल्याची बातमी आजरा पोलिसांना समजताच सहायक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

गडहिंग्लजचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनीही घटनास्थळी तातडीने भेट देऊन झाल्या प्रकाराची माहिती घेतली.

जोरदार पाऊस व अंधाराच्या मर्यादा आल्याने तपास मोहीम तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आली.

घटनेचे वृत्त समजताच आल्याचीवाडीसह गवसे पंचक्रोशीतील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

याबाबत रात्री उशिरा पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून, शवविच्छेदनानंतर परीट यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Back to top button