पुणे : आणखी ‘टीईटी’ बहाद्दर सापडले 2018च्या टीईटीतही 1, 663 जणांचा गैरप्रकार | पुढारी

पुणे : आणखी ‘टीईटी’ बहाद्दर सापडले 2018च्या टीईटीतही 1, 663 जणांचा गैरप्रकार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत गैरप्रकार केलेल्या उमेदवारांच्या संख्येत भर पडली आहे. राज्य परीक्षा परिषदेतर्फे 2018 मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) 1 हजार 663 उमेदवारांनी गैरप्रकार केले. या परीक्षेत संबंधित उमेदवार अपात्र ठरलेले असतानाही त्यांनी स्वत:ला पात्र करून घेतल्याचे निदर्शनास आले असून, त्यांची या परीक्षेतील संपादणूक रद्द करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दराडे यांनी 2018 च्या परीक्षेत गैरप्रकार केलेल्या उमेदवारांवरील कारवाईची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.

2018 मध्ये झालेल्या टीईटी परीक्षेतील गैरप्रकाराबाबत पुणे सायबर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या अनुषंगाने केलेल्या तपासादरम्यान उमेदवारांच्या गुणपत्रिकांची कसून तपासणी केली असता 1 हजार 663 उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे स्पष्ट झाले. त्यातील 779 उमेदवार अपात्र असताना त्यांनी त्यांच्या गुणांमध्ये फेरफार करून स्वतःला उत्तीर्ण केले, तर 884 उमेदवारांनी आरोपींच्या सहाय्याने बनावट गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र तयार करून घेतल्याचे आढळून आले. या गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांची संपादणूक रद्द करून परीक्षा परिषदेने संबंधितांवर दंडात्मक कारवाई केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्य परीक्षा परिषदेने 2019च्या टीईटीमध्ये गैरप्रकार केलेल्या 7 हजार 874 उमेदवारांची यादी काही दिवसांपूर्वीच जाहीर केली होती. त्यानंतर आता 2018च्या परीक्षेत 1 हजार 663 उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे समोर आले आहे.

Back to top button