‘सोंग’ चित्रपटाचा मुहूर्त | पुढारी

'सोंग' चित्रपटाचा मुहूर्त

पुढारी ऑनलाईन डेस्क : अलीकडे मराठी चित्रपटसृष्टीत येणाऱ्या वैविध्यपूर्ण कथा-विषयांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. मनोरंजनासोबतच समाजातील वास्तविकतेला अधिक वाव मिळताना दिसतोय. के.सी.एस प्रोडक्शन निर्मित असाच एक वेगळ्या धाटणीचा मराठी चित्रपट ‘सोंग’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. क्षितिज सी. शिंदे निर्मित आणि संजय कसबेकर लिखित-दिग्दर्शित ‘सोंग’ चित्रपटाचा मुहूर्त नुकताच कलाकार, तंत्रज्ञ आणि असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

भटक्या विमुक्त जमातीमधील एका सामान्य कुटुंबावर हा चित्रपट आधारलेला आहे. आज ही कित्येक दुर्गम भागात जिथे वीज नाही तिथे शिक्षणाचा अभाव. विकासापासून वंचित असलेला समाज आणि शिक्षणाचं महत्त्व यावर सडेतोड भाष्य करणारा हा चित्रपट आहे. लेखक-दिग्दर्शक संजय कसबेकर यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे.

या चित्रपटात मिलिंद शिंदे, नागेश भोसले, विकास समुद्रे, वीणा जामकर, पूर्णिमा अहिरे यांसारख्या अनुभवी कलाकारांसह विनोद दोंदे व प्रतिभा शिंपी आदींच्या भूमिका आपल्याला पहायला मिळणार आहेत. छायाचित्रणाची जबाबदारी संतोष बोराटे आणि संदीप साळुंखे यांनी सांभाळली आहे. कार्यकारी निर्माते जितू शिंदे आहेत.

याप्रसंगी अभिनेते मिलिंद शिंदे यांनी समाजातील व्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांची निर्मिती करण्यासाठी ‘अंगी मोठं धाडस असावं लागतं आणि ते निर्माते क्षितिज शिंदे आणि दिग्दर्शक संजय कसबेकर करीत आहेत. याचा मला आनंद असल्याचं मत व्यक्त केलं’. अत्यंत ज्वलंत असा हा विषय असून यावर चित्रपट येणं ही ‘सोंग’ चित्रपटाची उजवी बाजू असल्याचे ही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

‘सोंग’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे.

Back to top button