वडारवाडी, बाराबाभळीत पुन्हा ग्रामपंचायत ; महसुली गावांसाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव | पुढारी

वडारवाडी, बाराबाभळीत पुन्हा ग्रामपंचायत ; महसुली गावांसाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव

नगर  पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील नागरदेवळे, वडारवाडी व बाराबाभळी हे तीनही गावे नुकतीच त्रिशंकू जाहीर झालेली आहेत. त्यामुळे तेथे स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापनेची लगबग सुरु झाली. परंतु, वडारवाडी व बाराबाभळी ही दोन्ही गावे स्वतंत्रपणे महसुली गावात मोडत नाहीत. त्यामुळे दोन्ही गावांना महसुली गावांचा दर्जा मिळावा, असा प्रस्ताव जिल्हा परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे.  नागरदेवळे, वडारवाडी व बाराबाभळी या तीनही ग्रामपंचायती मिळून 20 मे 2022 रोजी नागरदेवळे नगरपरिषद अस्तित्वात आली. त्यामुळे या तीनही ग्रामपंचायतीचे अस्तित्व संपुष्टात आले होते. मात्र, या तीनही गावांतील नागरिकांच्या विरोधामुळे राज्य शासनाने 16 सप्टेंबर 2022 रोजी नागरदेवळे नगरपरिषद रद्द केली. त्यामुळे सध्या या तीनही गावांत स्थानिक स्वराज्य संस्थांचे अस्तित्व उरलेले नाही.

त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ही तीनही गावे सध्या नगरपरिषद किंवा ग्रामपंचायत हद्दीत येत नसल्यामुळे त्रिशंकू जाहीर केलेली आहेत. ही गावे त्रिशंकू जाहीर केल्यामुळे स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार जिल्हा परिषदची तयारी सुरु झाली.  स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापनेसाठी सदरची ग्रामपंचायत ही जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 4 (1) अनुसार स्वतंत्र महसुली गाव जाहीर असणे गरजेचे आहे. महसूल विभागाने स्वतंत्र महसुली गाव जाहीर न केलेल्या क्षेत्रासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करता येत नाही, अशी तरतूद आहे.

नागरदेवळे हे स्वतंत्र महसुली गाव आहे. मात्र, वडारवाडी व बाराबाभळी ही दोन्ही गावे स्वतंत्र महसुली गावे नाहीत. ही दोन्ही गावे भिंगार महसुली गावात समाविष्ट आहेत. त्यामुळे ही दोन्ही त्रिशंकू गावे स्वतंत्रपणे महसूली गावे जाहीर होणे गरजेचे आहे.
त्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने या दोन्ही त्रिशंकू गावांना स्वतंत्रपणे महसुली गावांचा दर्जा मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला आहे. महसुली गावे करण्याची प्रक्रिया ही किचकट आहे. यासाठी प्रारुप अधिसूचना जारी करावी लागणार आहे. त्यानंतर नागरिकांच्या हरकती मागविल्या जाणार आहेत. हरकतींवर सुनावणी घेतली जाणार आहे. त्यानंतर स्वतंत्र महसुली गावांची घोषणा केली जाणार आहे.

नगर तालुक्यात 121 महसुली गावे
जिल्ह्यात आजमितीस 1 हजार 606 महसुली गावे आहेत. सर्वाधिक 191 गावे अकोले तालुक्यातील आहेत. त्यानंतर 174 गावे संगमनेर तालुक्यात आहेत. नगर तालुक्यात सध्या 121 महसुली गावे असून, यामध्ये आता वडारवाडी व बाराबाभळी या दोन महसुली गावांचा समावेश होणार आहे. श्रीरामपूर तालुक्यात सर्वात कमी 56 गावे आहेत. एकूण 1 हजार 606 गावांपैकी 585 गावे खरीप हंगामात समाविष्ट केलेली आहेत.

Back to top button