परभणी: विधवा लेकीसाठी आईचे दोन दिवसांपासून भरपावसात आमरण उपोषण | पुढारी

परभणी: विधवा लेकीसाठी आईचे दोन दिवसांपासून भरपावसात आमरण उपोषण

गंगाखेड; पुढारी वृत्तसेवा: सैन्य दलात कर्तव्यावर असलेल्या पतीचे निधन झाल्यानंतर सासरच्या जाचाखाली असलेल्या आपल्या विधवा लेकीचा सासर मंडळीकडून होत असलेला त्रास तत्काळ थांबवावा, या मागणीसाठी सागरबाई रावसाहेब मुंडे (रा.ढवळकेवाडी) या सोमवारपासून तहसील कार्यालयासमोर भरपावसात आमरण उपोषणास बसल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील ढवळकेवाडी येथील रहिवासी कविता रावसाहेब मुंडे यांचा विवाह किनगाव येथील माधव दत्ता फड यांच्यासोबत १५ वर्षापूर्वी झाला होता. कविता माधव फड यांना तीन अपत्ये आहेत. भारतीय सैन्य दलात नोकरीला असलेले माधव फड यांचा दीड वर्षापूर्वी मृत्यू झाला. त्यानंतर जमीन व पैसे हडपण्यासाठी सासरकडच्या मंडळींकडून कविता फड हिला जीवे मारण्याच्या प्रयत्नासह शारीरिक मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली, असा उपोषणकर्त्या सागर बाईंचा आरोप आहे.

याप्रकरणी उपोषणकर्त्या सागरबाईंनी प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रार देत मदतही मागितलेली आहे. विधवा मुलीला न्याय मिळावा, यासाठी ढवळकेवाडी येथील सागरबाई रावसाहेब मुंडे या सोमवारपासून (दि.१०) आमरण उपोषणास बसलेल्या आहेत. दुसऱ्या दिवशी मंगळवारी सायंकाळपर्यंत त्यांच्या उपोषणाचे प्रशासनाच्या वतीने दखल घेण्यात आली नाही. विशेष बाब अशी की, संबंधित उपोषणकर्त्या महिलेची आर्थिक स्थिती अत्यंत हालाखीची असल्यामुळे अमरण उपोषणाद्वारे न्याय मागण्यासाठी बसल्यानंतर त्यांना मंडपदेखील उभा करण्यासाठी आर्थिक तरतूद नसल्याने त्या भरपावसात आपल्या मुलीसाठी न्याय मागत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button