धाराशिव: सांगवी येथे पत्र्यावरील दगड डोक्यात पडून वृद्धाचा जागीच मृत्यू

हनुमंत कोळपे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
हनुमंत कोळपे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

समुद्रवाणी: पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रासह जिल्हाभरात वादळी वारे व अवकाळी पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. वादळी वाऱ्यात घरांचे मोठे नुकसान होऊन जीवित व वित्तहानी होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. धाराशिव तालुक्यातील सांगवी येथे रविवारी (दि.२६) रात्री दहाच्या सुमारास अचानक वादळी वारे व जोराचा पाऊस सुरू झाला. यावेळी पत्र्यावरील दगड डोक्यात पडून वृद्ध शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. हनुमंत कोळपे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. कामेगाव व बोरगावात ३५ हून अधिक घरांचे मोठे नुकसान झाले आहे.

समुद्रवाणीसह परिसरातील आंब्याच्या बागा, केळीच्या बागा अक्षरशः भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अस्मानी सुलतानी संकट आले आहे. खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी रात्री साडेदहाच्या सुमारास सांगवी गावात पोहोचून पाहणी केली. कोळपे कुटुंबियांचे सांत्वन करत महसूल विभाग, आरोग्य विभागाला पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या.

बोरगाव (राजे) गावातील तब्बल ३५ हून अधिक घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र, कोणतीही जीवितहानी झाली नाही. भाजपचे नितीन काळे, राजेंद्र पाटील, व्यंकट पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुराद पठाण यांनी पाहणी केली. तर कामेगाव महावितरण सब स्टेशनचे लाईन मेन सुनिता देवकर, ग्रामसेवक माळी, तलाठी लिंबाळकर यांनी घटनास्थळाचे पंचनामे केले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news