
पुढारी ऑनलाईन – आर्थिक सुबत्ता मिळावी यासाठी दोन महिलांचा नरबळी देण्याचा धक्कादायक प्रकार केरळमध्ये उघडकीस आला आहे. पठाणमथिट्टा जिल्ह्यातील एलनथूर या गावात हा प्रकार घडला आहे. या महिलांचे अपहरण करून त्यांचा शिरच्छेद करण्यात आला होता. मृतदेहाचे तुकडे करून ते पुरण्यात आले होते. (Human Sacrifice in Kerala)
या प्रकरणात भगावल सिंग, त्याची बायको लैला यांना ताब्यात घेण्यात आले आहे तर रशिद उर्फ शफी नावाच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. भगवाल सिंग या डाव्या पक्षाचा कार्यकर्ता आणि कवी आहे.
कोचीचे पोलिस आयुक्त सी. एच. नागाराजू यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. "रशिद हा पहिला आरोपी आहे. तर भगवाल हा पारंपरिक औषधउपचार देतो. रशिद याने या महिलांना भगवालकडे पैशाच्या अमिषाने नेले होते. या महिलांना अत्यंत क्रुर प्रकारे ठार मारण्यात आले. भगवाल आणि लैला यांच्याविरोधातही गुन्हा नोंद केला जात आहे."
जून आणि सप्टेंबर महिन्यात रोझलिन आणि पद्मा या दोन महिला बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली होती. तपास सुरू असताना पोलिसांना नरबळीची माहिती मिळाली. "भगवाल आणि लैला यांनी गुन्हा कबुल केला आहे. रशिद या प्रकरणात एजंट होता. अत्यंत निर्घृणपणे ही हत्या करण्यात आली. देवाला प्रसन्न करण्यासाठी हा विधी करण्यात आला. या महिलांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले आणि ते भगवाल यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतात पुरण्यात आले."
पद्मा बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या बहिणीने दिली होती. पद्माच्या मोबाईल फोनवरून पोलिस रशिद उर्फ शफीपर्यंत पोहोचू शकले. त्यानंतर या दोन खुनांचा उलगडा झाला. तर रोझलिन ही ८ जूनपासून बेपत्ता होती. तिच्या बेपत्ता होण्यामागील गुढ पोलिसांना उलगडता आले नव्हते. पद्मा आणि रोझलिन या दोघींची आर्थिकस्थिती चांगली नव्हती. शफी आणि भगवाल यांची ओळख सोशल मीडियावर झाली होती. नरबळी दिला तर भगवालची आर्थिक स्थिती सुधारेल हे शफीने पटवून दिले होते. यातून हा भयानक प्रकार घडला हाेता.
हेही वाचा :