जळगाव : वीज पडून शेतमजूराचा मृत्यू, पत्नी मुलांसह चार जण जखमी | पुढारी

जळगाव : वीज पडून शेतमजूराचा मृत्यू, पत्नी मुलांसह चार जण जखमी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरुच असून अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे वीज पडून ४५ वर्षीय शेतमजूराचा मृत्यू झाला. तर शेतातील त्यांच्या पत्नी, सासू आणि दोन मुलेही जखमी झाले आहेत. दुपारी साडेतीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

आनंद सुरेश कोळी (४५) असे मयत शेतमजुराचे नाव आहे. मृत आनंद कोळी यांचे मांडळ हे सासर आहे. पत्नी प्रतिभा आणि दोन मुलासंह गेल्या १० वर्षांपासून ते मांडळ येथे राहत होते. सासू लटकनबाई कोळी यांच्या शेतात ते भुईमुगाच्या शेंगा काढण्यासाठी गेले असता दुपारी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्याने, आनंद कोळी, त्यांची पत्नी प्रतिभा कोळी, मोठा मुलगा राज, लहान मुलगा आणि सासू यांनी कडूनिंबाच्या झाडाखाली आश्रय घेतला. त्याचवेळी झाडावर वीज कोसळली. या घटनेत आनंद कोळी यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चौघे जखमी झाले. मांडळ येथील डॉ.शुभम पाटील आणि डॉ.नीलेश जाधव यांनी जखमींना तपासून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात हलवले. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आनंद कोळी यांना मृत घोषीत केले तर अन्य जखमींवर उपचार सुरु आहेत.

हेही वाचा:

Back to top button