ठाणे : पालकमंत्र्यांच्याच मतदारसंघातच शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून संघर्ष | पुढारी

ठाणे : पालकमंत्र्यांच्याच मतदारसंघातच शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून संघर्ष

ठाणे: पुढारी वृत्तसेवा : काही दिवसांपूर्वीच ठाण्यातील मनोरमानगर परिसरात शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे आणि ठाकरे गटात संघर्ष झाल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातच दोन्ही गट आमनेसामने आले. त्यामुळे या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. कोणातही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दसरा मेळाव्यासाठी ठाण्यातून निघालेल्या रॅलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून घोषणाबाजी करण्यात आली होती. या मुद्द्यावरूनच बुधवारी दोन्ही गटात वादाची ठिणगी पडली होती. त्यामुळे गुरुवारी रात्रीच शिंदे गटाचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक होऊन कोपरी येथील कुंभारवाडा परिसरात असलेल्या शिवसेना शाखेमध्ये दोन्ही गटात मोठ्या प्रमाणात हमरीतुमरी आणि शाब्दिक राडा झाला. तर शुक्रवारी सकाळी शाखा ताब्यात घेण्यावरून पुन्हा राडा झाल्याने या परिसरातील वातावरण चांगलेच तापले होते.

कोपरी परिसरातील कुंभारवाडा भागात शिवसेना शाखा असून हा परिसर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघात येतो. त्यामुळे हा परिसर एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मनाला जातो. या शिवसेना शाखेचे शिंदे गटाकडून नुतनीकरण करण्यात येणार आहे. परंतु ही शाखा तोडणार आहेत, अशी अफवा पसरली आणि त्यानंतर शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, उपनेत्या अनिता बिर्जे हे कृष्णकुमार कोळी हे समर्थकांसह शाखेत दाखल झाले. त्याचवेळेस शाखेत शिंदे गटाचे प्रकाश कोटवानी, रोहित गायकवाड, माजी नगरसेवक मालती पाटील आणि शर्मिला पिंपोळकर या उपस्थित होत्या. त्यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते परिसरात जमू लागले आणि शाखा ताब्यात घेण्यावरून दोन्ही गट आमने सामने आले. परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. या वादाबाबत माहिती मिळताच शिंदे गटाचे प्रवक्ते प्रमुख नरेश म्हस्के, राम रेपाळे यांच्यासह कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानंतर शाखेत जाऊन बसले. परंतु त्याआधीच पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करत दोन्ही गटांना शाखेची चावी देऊन वाद मिटविला.

यापूर्वीही मनोरमा नगरची शाखा ताब्यात घेण्यावरून असाच दोन्ही गटात राडा झाला होता. त्यानंतर आता थेट पालकमंत्र्यांच्या मतदार संघातच दोन्ही गटांमध्ये संघर्ष झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यामुळे हा वाद निवळला. त्यानंतर बरच वेळ शिंदे गटाचे पदाधिकारी या शाखेत बसून होते. तर शाखेच्या बाहेर लावण्यात आलेला शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा बॅनरदेखील या ठिकाणावरून हटवण्यात आला. हा बॅनर हटवताना काही काळ तणाव निर्माण झाला होता.
या शाखेचे काम मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सहकार्यानेच सुरुवातीपासूनच सुरु आहे. कोविडचे कामही याच शाखेत बसून झाले. शाखेत कोणालाही बसायला बंदी घलण्यात आलेली नाही. मात्र, कोणाही बाहेरचे येऊन शाखेवर हक्क सांगायला लागल्यास खपवून घेणार नाही. केवळ प्रसिद्धी मिळावी, म्हणून अशाप्रकारचे स्टंट सुरु आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button