BCCI ला नवा ‘बॉस’ मिळण्याची दाट शक्यता! सौरव गांगुलींचा निरोप समारंभ... | पुढारी

BCCI ला नवा ‘बॉस’ मिळण्याची दाट शक्यता! सौरव गांगुलींचा निरोप समारंभ...

पुढारी ऑनलाईन डेस्क : बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष म्हणून सौरव गांगुली यांचे काहीच दिवस शिल्लक आहेत. लवकरच बीसीसीआयच्या सर्व पदांसाठी फेरनिवडणुका होणार असून सौरव गांगुली पुन्हा या पदासाठी दावेदार नसल्याचे सूत्रांकडून समजते आहे. त्यामुळे बीसीसीआयला आता नवा अध्यक्ष मिळणार असल्याच्या चर्चांना उधान आले आहे. दरम्यान, बीसीसीआयचा नवा अध्यक्ष कोण होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. बीसीसीआयच्या नव्या अध्यक्षपदावर आता कोण बसणार याबाबत दोन नावे आघाडीवर असून त्यापैकी एकाचीच वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

18 ऑक्टोबरला मिळणार बीसीसीआयला नवा बॉस

बीसीसीआयच्या (BCCI) अध्यक्षपदासाठी 18 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. मुंबईत ही निवडणूक होणार असून, त्यापूर्वी 11 आणि 12 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. त्यानंतर 13 ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. 14 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून त्यानंतर दोनपेक्षा जास्त दावेदार असल्यास 18 ऑक्टोबर रोजी मतदानाची मतनान होईल. दरम्यान, टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली पुन्हा अध्यक्ष होण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे सूत्रांच्या हवाल्याने कळवले आहे. तसेच बीसीसीआयचे सचिव जय शाह हे देखील अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसून ते पुन्हा त्याच पदासाठी म्हणजेच सचिवपदासाठी निवडणूक लढवणार असल्याचे समजते आहे.

दरम्यान, अध्यक्षपदासाठी बीसीसीआयचे (BCCI) उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि टीम इंडियाचे माजी खेळाडू रॉजर बिन्नी या दोन दावेदारांची नावे पुढे येत आहेत. यासंदर्भात बीसीसीआयच्या अनेक दिग्गजांमध्ये बैठकाही झाल्याचे काहींनी म्हटले आहे.

राजीव शुक्ला आणि रॉजर बिन्नी नवे अध्यक्ष होणार?

बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत रॉजर बिन्नी यांचे नाव अचानक पुढे आले आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली 1983 मध्ये पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकलेल्या भारतीय संघाचे बिन्नी हे सदस्य होते. ते कर्नाटकचे असून त्याचा मुलगा स्टुअर्ट बिन्नीही टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे.

दुसरीकडे, जर आपण राजीव शुक्ला यांच्याबद्दल बोलायचे झाले, तर ते सध्या बीसीसीआयचे उपाध्यक्ष आहेत आणि बर्याच काळापासून मंडळाशी संबंधित आहेत. शुक्ला हे काँग्रेसचे तगडे नेते आहेत. दरम्यान, शुक्ला आणि बिन्नी या दोघांपैकी एक बीसीसीआयचा नवा बॉस बनू शकतो आणि एकाला आयपीएलचे अध्यक्ष बनवले जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख जवळ येत आहे. अशा स्थितीत लवकरच सौरव गांगुली आपल्या निर्णयाबद्दल मोठे विधान करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Back to top button