नानगाव : ताई, जरा या खड्ड्यांचा सेल्फी काढता का? | पुढारी

नानगाव : ताई, जरा या खड्ड्यांचा सेल्फी काढता का?

नानगाव; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्रात युतीचे सरकार होते तेव्हा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या रस्त्यावरील खड्ड्यांचे सेल्फी फोटो काढत एक मोहीमच हाती घेतली होती. मात्र नंतरच्या काळात महाविकास आघाडीची सत्ता आली आणि खड्ड्यांची मोहीम अर्धवट राहिली. मात्र आता पुन्हा शिंदे-फडणवीस यांचे सरकार आले आहे, त्यामुळे जर पुन्हा खड्ड्यांची सेल्फी मोहीम सुरू होणार असेल तर ताई चौफुला-न्हावरा रस्त्यावर मोठे खड्डे आहेत. तेवढा सेल्फी फोटो काढण्यासाठी याल का, असे आमंत्रण या भागातील नागरिक देत आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघ जवळच आहे. चौफुला आणि न्हावरा हा शिरूर – सातारा मार्गाने जोडला आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत खा. सुळे यांना चौफुला, केडगाव, खोपोडी व पारगाव या गावातील नागरिकांनी मतदान केले आहे. तर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना नागरगाव, रांजणगाव सांडस, न्हावरा येथील मतदारांनी मतदान केलेले आहे. त्यामुळे आपापल्या भागातील नागरिकांना मिळणार्‍या सेवा-सुविधा व्यवस्थित मिळतात का? याकडे लोकप्रतिनिधींनी पाहणे तेवढेच गरजेचे आहे.

शिरूर- सातारा मार्गावरील चौफुला- न्हावरा रस्ता हा वाहतुकीसाठी दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे दिसून येत आहेत. मात्र हे खड्डे लोकप्रतिनिधींना दिसत का नाहीत, हे एक न उलगडणारे कोडेच आहे. निवडणुकांच्या काळात अनेक अश्वासने दिली जातात. रस्ते, वीज आणि पाणी या मूलभूत सुविधा पुरविण्यात येतील असे अनेकदा सांगितले जाते. मात्र निवडणुका होऊन गेल्यावर ही आश्वासने हवेत विरून जातात की काय, असा प्रश्न अनेकदा नागरिकांना पडतो.

खराब झालेल्या व खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती होत असते, मात्र आज बुजविण्यात आलेला खड्डा लगेच उद्या आहे तसा पुन्हा दिसतो. त्यामुळे रस्त्याच्या डागडुजीसाठी मोठ्या प्रमाणावर रक्कम खर्च होते. मात्र कामे चांगली होत नाहीत. त्यामुळे खराब कामे करणार्‍या ठेकेदारांवर कडक कारवाई करण्यात यावी. आम्हाला या रस्त्यावरील खड्ड्यांचा खूपच त्रास सहन करावा लागत आहे. चांगला रस्ता होईल तेव्हा होईल, पण सध्या या रस्त्यावर पडलेल्या धोकादायक खड्ड्यांची दुरुस्ती करा, अशी मागणी ग्रामस्थ, वाहनचालक व प्रवाशांमधून पुढे येत आहे.

व्यापारीही त्रस्त
खड्ड्यांमुळे प्रवासी, नागरिक, वाहनचालक जसे हैराण झाले आहेत, तसेच गावागावांतील रस्त्यालगत असणार्‍या व्यापार्‍यांना देखील मोठी अडचण होत असते. पाऊस पडल्यावर रस्त्यावरील खड्ड्यांतील पाणी व चिखल आणि पाऊस नसेल तेव्हा खड्ड्यांमधील फुपाट्याचा त्रास या व्यावसायिकांना सहन करावा
लागत आहे.

तेवढे खड्ड्यांचं बघा
या मार्गाचे काम लवकर सुरू होणार असल्याचे अनेक दिवसांपासून बोलले जात आहे. मात्र, आजतागायत या रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळालेला दिसत नाही. मोठा रस्ता होत असेल, तर चांगलीच गोष्ट आहे. मात्र, सध्या खड्ड्यांचं तेवढं बघा, नाहीतर चांगला रस्ता पाहण्यासाठी आम्ही असेलच, असे सांगता येत नाही.

Back to top button