पुणे : परकीय भाषेकडे विद्यार्थ्यांचा ओढा; 4 ते 14 वयोगटातील मुलांचा फ्रेंच, जर्मन शिकण्याला प्राधान्य | पुढारी

पुणे : परकीय भाषेकडे विद्यार्थ्यांचा ओढा; 4 ते 14 वयोगटातील मुलांचा फ्रेंच, जर्मन शिकण्याला प्राधान्य

पुणे; पुढारी वृत्तसेवा: जर्मन असो जपानी… फ्रेंच असो वा स्पॅनिश… अशा विविध परकीय भाषा शिकण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे.  खासकरून शाळांमधून विद्यार्थ्यांना परकीय भाषा शिकवल्या जात असून, 4 ते 14 वयोगटातील शालेय विद्यार्थी परकीय भाषा शिकत आहेत. जपानी, फ्रेंच आणि जर्मन भाषा शिकण्याकडे सर्वाधिक कल आहे आणि अनेक संस्थांमधील भाषातज्ज्ञ विद्यार्थ्यांना परकीय भाषेचे शिक्षण देत आहेत. भाषा शिक्षण खूप महत्त्वाचे असून, शालेय विद्यार्थ्यांमध्ये भाषिक शिक्षणाची गोडी वाढत आहे.

भारताचे इतर देशांशी असलेले व्यापारी संबंध, संस्कृतीचे आदानप्रदान, नोकरी-व्यापाराच्या संधी, अशा विविध कारणांमुळे परकीय भाषांकडे ओढा वाढत आहे. पालकही मुलांना अशा भाषा शिकविण्यासाठी विविध वर्गांना पाठवीत असून, वर्गांमध्ये विद्यार्थी भाषा शिकत आहेत.

परकीय भाषातज्ज्ञ सौमित्र महाजन म्हणाले, ‘फ्रेंच आणि जर्मन भाषा शिकण्यावर अधिक भर आहे. जर्मन भाषा ही जराशी इंग्रजी भाषेजवळ जाणारी असल्याने ती शिकणे खूप सोपे जाते. त्यामुळे जर्मन भाषा ही विद्यार्थ्यांना आपलीशी वाटते. त्यामुळे ती भाषा शिकायला सोपी वाटते. म्हणूनच, ही भाषा शिकण्याकडे कल आहे. त्याचबरोबर फ्रेंच आणि जपानी भाषा शिकण्यावर भर दिला जात आहे.

पालक मुलांना परकीय भाषा शिकवण्याला प्राधान्य देत आहेत. आता विद्यार्थ्यांचा जपानी भाषा शिकण्याकडे सर्वाधिक कल आहे. शालेय विद्यार्थ्यांना भाषिक शिक्षण देण्याची पद्धत वेगळी असते. भाषिक शिक्षण देण्याची शास्त्रीय पद्धत असते. विद्यार्थी ऐकता, ऐकता भाषा बोलायला लागतात, त्यानंतर भाषा लिहायला, वाचायला शिकवले जाते. मातृभाषेप्रमाणे विद्यार्थ्यांना परकीय भाषा आम्ही शिकवतो. ऐकणे, बोलणे, वाचणे आणि सगळ्यात शेवटी लिहिणे ही भाषा शिक्षणाची पद्धत आहे. त्या पद्धतीने आम्ही त्यांना जपानी भाषा शिकवतो.
                                                   – रेश्मा कुलकर्णी, परकीय भाषातज्ज्ञ 

परकीय भाषांमध्ये जर्मन ही भाषा शिकणारे विद्यार्थी सर्वाधिक आहेत. मी शाळेत जर्मन भाषा शिकवते. या भाषेत अनेक संधी असल्याने ही भाषा विद्यार्थ्यांना शिकवली जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये परकीय भाषा शिकण्यासाठीची उत्सुकता पाहायला मिळते.
                                                    – रूपा पांडे, जर्मन भाषा शिक्षिका,
                                  अभिनव एज्युकेशन सोसायटीज इंग्लिश मीडियम स्कूल

Back to top button