सुळेंनीही घाईघाईत गाठले पिंपळगाव, नुकताच झाला होता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा दौरा | पुढारी

सुळेंनीही घाईघाईत गाठले पिंपळगाव, नुकताच झाला होता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा दौरा

राहू : पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाजप मतदार संवाद दौर्‍यात दौंड तालुक्यातील ज्या पिंपळगाव गावाला भेट दिली होती, त्या गावात मंगळवारी (दि.27) तिसर्‍याच दिवशी खासदार सुप्रिया सुळे पोहचल्या आणि तेथे त्यांनी गावभेट दौर्‍याअंतर्गत मतदारांशी संवाद साधला. सीतारामन यांच्या बारामती मतदारसंघाच्या दौर्‍याचा राष्ट्रवादीने चांगलाच धसका घेतल्याचे सुळे यांच्या दौर्‍यामुळे स्पष्ट झाले आहे.  सुळे यांचा हा दौरा खरे तर पूर्वनियोजित नव्हता, परंतु निर्मला सीतारामन यांच्या या भागातील दौर्‍यानंतर राष्ट्रवादी काँग्रेंसने घाईघाईने हा गाव भेट दौरा आयोजित केला.

सीतारामन यांनी पिंपळगावसह भाजपचे दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या राहू या गावालाही भेट दिली होती. त्याच पट्ट्यातील पारगाव, उंडवडी, नाथाचीवाडी, पिंपळगाव या गावांचा दौरा सुळे यांनी केला. राष्ट्रवादीचे स्थानिक नेते, कार्यकर्ते त्यांच्याबरोबर होते. भाजप आणि राज्य सरकारला निशान्यावर घेत सुळे यांनी सीतारामन यांच्या दौर्‍याचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला. सीतारामन यांच्या दौर्‍यानंतर सुळे यांनी आपल्या गावभेट दौर्‍यावर भर दिल्याने राष्ट्रवादीतील धाकधूक लक्षात आली. सुळे यांनी सोमवारी बारामतीतील काही गावांचा दौरा केला, तर बुधवारी त्या इंदापूरच्या दौर्‍यावर आहेत. सुळे यांच्या अचानक झालेल्या या गावोगावच्या दौर्‍याची मोठी चर्चा सध्या सुरू आहे. सीतारामन यांच्या दौर्‍याशी याचा थेट सबंध लावला जात आहे.

माणसाने नेहमी खाल्ल्या मिठाला जागले पाहिजे. ज्यांनी तुम्हाला सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून मंत्रिपदापर्यंत पोहचविले अशाच लोकांना जर तुम्ही खोके घेऊन  धोका देणार असाल, तर ते लाजिरवाणे असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता
या वेळी केली. महागाई आणि इंधनवाढीने सध्या सर्वसामान्य माणसाचे जगणे मुश्कील झाले आहे. त्यांना सरकारने काही दिलासा देणे गरजेचे आहे. काही लोकांना शिवसेनेचे चिन्ह, पक्ष, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सर्व हवे आहे. मात्र, शिवभोजन थाळी मात्र बंद करून नेमके काय साध्य केले आहे, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

माजी आमदार रमेश थोरात म्हणाले की, वेदांतासारखे प्रकल्प राज्यातून बाहेर गेल्यामुळे अनेक तरुणांचा रोजगार गेला आहे. काही लोक येऊन खासदारांचे काम चांगले नसल्याचे म्हणत आहेत, हे योग्य नाही. जनतेला सर्व समजत असून, येणार्‍या निवडणुकीत जनता सुज्ञपणे निर्णय घेईल, असे ते म्हणाले. या वेळी वैशाली नागवडे, तुषार थोरात, नितीन दोरगे, नारायण जगताप, राजेंद्र शितोळे, दीपक कापरे, सतीश थोरात आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button