बीड: श्री. योगेश्वरी देवीच्या नवरात्रोत्सवास घटस्थापनेने होणार प्रारंभ | पुढारी

बीड: श्री. योगेश्वरी देवीच्या नवरात्रोत्सवास घटस्थापनेने होणार प्रारंभ

अंबाजोगाई: पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत संपन्न होत आहे. महोत्सवाच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. त्या पार्श्वभूमीवर मंदिर सुरक्षा व्यवस्थेसाठी प्रशासनाच्या वतीने ठोस उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. कोरोना नंतर सलग दोन वर्षांनी खुल्या वातावरणात महोत्सव साजरा होत असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोमवारी २६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता घटस्थापना व महापुजा तहसीलदार यांच्या उपस्थितीत होणार आहे.त्यानंतर महोत्सवास सुरुवात होणार आहे. महोत्सवाच्या कालावधीत दररोज संगीत भजन, गायन कीर्तन, जगदंबेचा गोंधळ अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कोरोनाच्या निर्बंधानंतर आता या वर्षी खुल्या वातावरणात हा महोत्सव साजरा होत आहे. सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत भाविकांना श्री.योगेश्वरी देवीचे थेट दर्शन घेता येणार आहे. सकाळी ६ ते दुपारी ११ वाजेपर्यंत देवीस अभिषेक करता येणार आहेत.
भाविकांनी महोत्सवा निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन योगेश्वरी देवल कमेटीचे अध्यक्ष तथा तहसीलदार विपीन पाटील,सचिव ॲड. शरद लोमटे यांनी केले आहे.

मंदिर व्यवस्थापनाची बैठक

श्री.योगेश्वरी देवीच्या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकारी शरद झाडके, तहसीलदार तथा योगेश्वरी देवल कमिटीचे अध्यक्ष विपिन पाटील, सचिव अ‍ॅड. शरद लोमटे, मुख्य पुजारी सारंग पुजारी, विश्वस्त राजकिशोर मोदी, अक्षय मुंदडा, पृथ्वीराज साठे, कमलाकर चौसाळकर, गिरीधारीलाल भराडिया, प्रा. अशोक लोमटे, उल्हास पांडे, श्रीराम देशपांडे, संजय भोसले, डॉ.संध्या जाधव, गौरी जोशी, पूजा कुलकर्णी, यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार मंदिर परिसरात कडेकोट सुरक्षा उपाययोजना आखण्यात आल्या. परिसरातील स्वच्छता व विविध सोयीसुविधा भक्तांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे देवल कमिटीचे सचिव ॲड. शरद लोमटे यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button