उस्मानाबाद : तुळजाभवानी मंदिरात सोमवारी दुपारी हाेणार घटस्थापना | पुढारी

उस्मानाबाद : तुळजाभवानी मंदिरात सोमवारी दुपारी हाेणार घटस्थापना

तुळजापूर : डॉ. सतीश महामुनी : नवरात्रोत्सवानिमित्त महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यांमधून खूप मोठ्या संख्येने भाविक तुळजापुरात येत असतात. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. सोमवारी (दि.२६) पहाटे व सकाळी श्रीदेवीजींची अभिषेक पंचामृत महापूजा, नैवेद्य व दुपारी १२.०० वाजता घटस्थापना होणार आहे.

तुळजाभवानी मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. कौस्तुभ दिवेगावकर सपत्नीक घटस्थापना विधीला बसणार आहेत.तर सायंकाळी अभिषेक पंचामृत महापूजा, नैवेद्य, आरती व रात्री छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. या महोत्सवात दि. २६ सप्टेंबर ते दि.१० ऑक्टोबरपर्यंत या काळात शारदीय नवरात्र महोत्सवाचे धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. दिवेगावकर यांच्या हस्ते व सर्व मानकरी, पुजारी, पाळेकरी यांच्या उपस्थितीत विधिवत घटस्थापना करण्यात येणार आहे.

मंगळवारी (दि.२७) सकाळी व सायंकाळी दोन्ही वेळा श्री देवीची अभिषेक पंचामृत महापूजा, नैवेद्य, आरती व रात्री छबिना मिरविण्यात येणार आहे. तसेच बुधवारी (‌दि.२८) सकाळी व सायंकाळी दोन्ही वेळा श्री देवीचा अभिषेक, पंचामृत, महापूजा, नैवेद्य, आरती व रात्री छबिना काढण्यात येणार आहे.

गुरुवारी (दि.२९) श्रीदेवीची अभिषेक पंचामृत रथ अलंकार महापूजा, नैवेद्य, आरती व सायंकाळी अभिषेक आरती व रात्री छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच शुक्रवारी (दि.३०) ललित पंचमी दिनी श्री देवीजींची पंचामृत मुरली अलंकार महापूजा, नैवेद्य, आरती, सायंकाळी अभिषेक आरती व रात्रीचे छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे.

शनिवारी (दि. १) श्री देवीजींची अभिषेक पंचामृत शेषशाही अलंकार महापूजा, नैवेद्य, आरती, सायंकाळी अभिषेक आरती व रात्री छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. रविवारी (दि.२) श्री देवीजींची अभिषेक पंचामृत भवानी तलवार अलंकार महापूजा, नैवेद्य, आरती, सायंकाळी अभिषेक आरती व रात्रीचे छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे.

सोमवार (दि.३)दुर्गाष्टमी दिनी श्री देवीजींची अभिषेक पंचामृत महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा सायंकाळी ११.३० वाजता वैदिक होमास व हवनास आरंभ तर दुपारी ४.४५ मिनिटांनी पूर्ण होतील. रात्री छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच मंगळवारी (दि. ४) महानवमी (खंडे नवमी) श्री देवीजींची नित्योपचार महापूजा, दुपारी १२.०० वाजता होमावर अजाबली आपली व घटोत्थापन (घट उठविणे) दिवसभर नैवेद्य, दर्शन व रात्री पलंग पालखीची मिरवणूक काढण्यात येईल.

बुधवारी (दि.५) विजयादशमी (दसरा) उष:काली श्री देवीजींची शिबिकारोहन, मंदिराभोवती मिरवणूक व मंचकी निद्रा विजयादशमी सार्वत्रिक सीमोल्लंघन तसेच रविवारी (दि.९) कोजागिरी पौर्णिमा दिनी पहाटे श्री देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना नित्योपचार पूजा, अभिषेक पंचामृत महापूजा, नैवेद्य, आरती व रात्रीचा छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे.

सोमवारी (दि.१०) सकाळी व सायंकाळी श्री देवीजींची अभिषेक पंचामृत महापूजा, नैवेद्य, सोलापूर काठ्यासह आरती व रात्रीचे छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. श्री तुळजाभवानी मंदिरात धार्मिक पूजा, विधी व सेवा आदी कार्यक्रम करण्यात येणार आहेत.

भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय

तुळजाभवानीच्या ऑनलाईन दर्शनासाठी WWW.shrituljabhavani.in या संकेतस्थळावरुन दर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केले आहे.

नवरात्र कालावधीमध्ये घाटशिरस रोड येथून भाविकांना दर्शनासाठी येणार आहे. २५ हजार भाविक उभे राहतील, असा २५० बाय २०० आकाराचा भव्य मंडप उभारण्यात आला आहे. येथे पोलीस व्यवस्था पुरेशी तैनात करण्यात आली आहे. मदत केंद्र, चप्पल स्टँड आणि इतर अत्यावश्यक सेवा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button