केडगाव : वाहनांची कागदपत्रे, कायदेशीर बाबी पूर्ण करा; अन्यथा कारवाई | पुढारी

केडगाव : वाहनांची कागदपत्रे, कायदेशीर बाबी पूर्ण करा; अन्यथा कारवाई

केडगाव; पुढारी वृत्तसेवा: दौंड तालुक्यातील वाहनमालकांनी वाहनांची योग्य ती कायदेशीर कागदपत्रे तयार करून घ्यावीत. त्याची प्रत वाहनात ठेवावी. वाहन तंदुरुस्त प्रमाणपत्र आवश्यक असावे; अन्यथा फिरत्या पथकाकडून योग्य ती कारवाई केली जाईल तसेच वाहनही जप्त केले जाईल, असा इशारा बारामतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी दिला आहे. दौंड तालुक्यातील वाहनांच्या वेगवेगळ्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर परिवहन विभागाकडे गेल्या आहेत. नंबरप्लेट नसणे, अवजड वाहनांना दुचकीचा नंबर टाकणे, वाहनांवर नंबरच नसणे, अवैध वाहतूक करणे, वाहन फिटनेस नसणे, ट्रॅक्टरला तीन ट्रॉली जोडून धोकादायक प्रवास करणे, या प्रमुख तक्रारी आहेत.

बारामती परिवहनकडे 4 लाख 90 हजार 779 वाहनांची नोंदणी आहे. यामध्ये दुचाकींची संख्या 35675, चारचाकी 53774, टॅक्सी 864, रिक्षा परवानाधारक1896, अवजड वाहने (डंपर, जेसीबी आणि अन्य मालवाहतूक करणारी वाहने) 34416 आहेत. बारामती परिवहनचे महसूल उद्दिष्ट यंदा 119 कोटी एवढे असून, मागील पाच महिन्यांत 56 कोटींचा महसूल जमा केला आहे.

भरारी पथकाने 51 लाख 17 हजार रुपयांचा महसूल मिळविला आहे, असेही केसकर यांनी सांगितले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वाहन परवाने, त्यासाठी असणारे कायदे, याबाबत माहिती देण्यात येणार आहे. यासाठी दौंड तालुक्यातील महाविद्यालय व्यवस्थापनाने सहकार्य केल्यास ते उद्दिष्ट सफल करता येईल, अशी माहितीही केसकर यांनी दिली.

Back to top button