संगमनेर : वाहनचालकांना लुटणारी टोळी गजाआड, आठ दुचाकींसह अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत | पुढारी

संगमनेर : वाहनचालकांना लुटणारी टोळी गजाआड, आठ दुचाकींसह अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा: संगमनेर शहर आणि ग्रामीण भागात चाकूचा धाक दाखवून लूटमार करणार्‍या टोळीमधील तिघांच्या पोलिस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या पथकाने मुसक्या आवळून त्यांना गजाआड केले आहे. त्यांच्याकडून आठ दुचाकीसह सुमारे 2 लाख 78 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

संगमनेर शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात लूटमारीच्या तसेच मोटरसायकल चोरीच्या घटना घडलेल्या होत्या. या घटनेतील चोरटे शोधण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे ठाकले होते. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी संगमनेर उपविभागाचे पोलिस उपाधीक्षक राहुल मदने यांना गुन्हेगारांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानुसार मदने यांच्या पथकातील पो. ना. अण्णासाहेब दातीर, फुरकान शेख, पो. कॉ. अमृत आढाव, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, गणेश शिंदे यांचे पथक तयार करुन गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या.

निंबाळे चौफुली येथे धनंजय बाबासाहेब वर्पे (रा. रहिमपूर), प्रभाकर चंदू आव्हाड (रा. वाघापूर) तसेच पोखरी हवेली जवळ सागर विठ्ठल काळे (पारेगाव खुर्द) यांना मारहाण करुन मोबाईल, रोख रक्कम व कागदपत्रे चोरल्याची घटना घडल्या होत्या. याबाबत तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच जांभुळवाडी फाट्या जवळ अमोल गवराम कोटकर (पिंपळे) हे टेंपो लावून झोपलेले असता त्यांना मारहाण करीत मोबाईल, रोख रक्कम व कागदपत्रे घेवून पोबारा केला होता. या बाबतही तालुका पोलिसांत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यांचा तपास करुन कलीम अकबर पठाण (वय 20), सलीम अकबर पठाण (वय 22, दोन्ही रा. कोल्हेवाडी रोड, संगमनेर) आणि जुनेद यूनुस शेख (वय 23 वर्षे, रा.जमजम कॉलनी, संगमनेर) यांना ताब्यात घेत अटक केली आहे. त्यांच्याकडून मोटारसायकल, चाकू, चोरीस गेलेले मोबाईल हस्तगत केले आहे.

संबंधित बातम्या

आरोपींकडून इतरही गुन्ह्यांची उकल होणार

पोलिसांनी अटक केलेले तीनही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर संगमनेर शहर, संगमनेर तालुका व शिर्डी पोलिसांत डझनभर गुन्हे दाखल आहे. त्यांच्याकडून अजूनही अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिस उपाधीक्षक राहुल मदने यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Back to top button