बारामती : शेअर्स अपहारप्रकरणी एकाला अटक | पुढारी

बारामती : शेअर्स अपहारप्रकरणी एकाला अटक

बारामती; पुढारी वृत्तसेवा: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यातील शेअर्सची परस्पर विक्री करीत त्याच्या रकमेचा अपहार करीत फसवणूक केल्याप्रकरणात पोलिसांनी कारखान्याचे निवृत्त कर्मचारी श्रीकांत काकडे यांना अटक केली आहे. त्यांना सोमवारपर्यंत (दि. 19) बारामती न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांच्यासह अन्य लोकांवर वडगाव निंबाळकर पोलिसांनी फेब—ुवारी महिन्यात गुन्हा दाखल केला होता.

शहाजीराव काकडे यांचे भाचे अभिजित बापूसाहेब देशमुख (रा. कळंबवाडी, ता. बार्शी, जि. सोलापूर, सध्या रा. नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे) यांनी फिर्याद दिली होती. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात शहाजीराव काकडे यांच्या मनीषा देशमुख व अनिता देशमुख या बहिणींचे प्रत्येकी पाच हजारांचे असलेले शेअर्स 2011 साली बनावट सह्या करून काढून घेत त्याच्या रकमेचा अपहार करण्यात आला. तसेच, बहिणींच्या नावे असलेल्या साडेआठ एकर जमिनीचे बनावट असाइन्मेंट डीड करीत परस्पर विक्री करून फसवणूक केल्याचेही फिर्यादीत म्हटले होते.

या गुन्ह्यात ‘सोमेश्वर’चे तत्कालीन अध्यक्ष शहाजीराव काकडे यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे. गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू करण्यात आला होता. त्यात शेअर्स प्रकरणात श्रीकांत काकडे यांचा सहभाग असल्याच्या कारणावरून त्यांना अटक करण्यात आली आहे. सोमवार (दि. 19) पर्यंत त्यांना पोलिस कोठडी मिळाली आहे, अशी माहिती या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजकुमार किंद्रे यांनी दिली.

 

Back to top button