पुणे : लम्पीबाबत अफवा पसरविल्यास कारवाई; 187 पशुधनाचा मृत्यू | पुढारी

पुणे : लम्पीबाबत अफवा पसरविल्यास कारवाई; 187 पशुधनाचा मृत्यू

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘राज्यात गोवंश वर्गातील जनावरांमध्ये लम्पी या विषाणूजन्य रोगाचा प्रसार होत आहे. या रोगाबाबत समाज माध्यमांमधून काही अफवा पसरविली जात असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल,’ असा इशारा पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिला आहे. दरम्यान, राज्यात लम्पीमुळे आजअखेर सुमारे 187 जनावरांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
लम्पी हा चर्मरोग आजार केवळ गाई व बैलांना होत असून, त्याचा मानवी आरोग्याला कोणताही धोका संभवत नाही.

या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ग्रामपंचायत व नगरपरिषद अधिकार्‍यांनी मोठ्या प्रमाणात सामाजिक माध्यमांचा (सोशल मीडिया) वापर करून जनजागृती करावी, अशा सूचना पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी- अधिकार्‍यांना देण्यात आला आहे. शासकीय पशुवैद्यकांनी तसेच खासगी पशुवैद्यक व्यावसायिकांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दिलेल्या नियमानुसार उपचार करावेत. शासकीय अधिकार्‍यांनी पशुपालकांकडे जाऊन औषधोपचार व लसीकरण करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

शासनाकडून मोफत औषधोपचार व लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत तक्रार असल्यास संबंधितांवर सक्त कारवाई करण्यात येणार आहे. पशुपालकांनी अशी तक्रार विभागाचा टोल फ—ी क्र. 1800-2330-418 अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटरमधील पशुसेवेचा टोल फ—ी क्र. 1962 वर नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा रोग माशा, डास, गोचिड इत्यादी कीटकांमार्फत पसरत असल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीने कीटनाशकांची फवारणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, रविवारअखेर (दि.18) राज्यात 963 गावांमध्ये फक्त 7 हजार 356 जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील 2 हजार 730 पशुधन उपचाराने बरे झाले आहे. उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरू आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यात 48 लाख 93 हजार इतकी लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यातून 17 लाख 76 हजार पशुधनास लसीकरण करण्यात आले असून, पुढील लसीकरण सुरू आहे. 20 सप्टेंबरला आणखी 25 लाख लसमात्रा उपलब्ध होणार आहेत.

Back to top button